सीमेवरील गावांना मिळणार जवळच्या तालुक्यांमधून धान्य
By नितीन चौधरी | Updated: January 29, 2025 15:25 IST2025-01-29T15:24:38+5:302025-01-29T15:25:21+5:30
वेळेत धान्य मिळण्यासाठी राज्यभर नियोजन; मार्चपासून अमंलबजावणी

सीमेवरील गावांना मिळणार जवळच्या तालुक्यांमधून धान्य
पुणे : गेल्या चार महिन्यांपासून राज्यभर धान्य वितरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेकदा तालुक्याच्या गुदामातून त्याचा तालुक्यातील दूरवरच्या गावांना धान्य पोहोचण्यास होणारा विलंबही वितरणात अडथळा निर्माण करतो. तसेच दूरवर धान्य पोहोचविण्यासाठी लागणारा वेळही जास्त असतो. तसेच इंधनही मोठ्या प्रमाणावर खर्च होते. हे टाळण्यासाठी आता राज्यभरात धान्य वितरण सुकर व्हावे यासाठी तालुक्यांच्या सीमेवरील गावांना दुसऱ्या तालुक्यांमधील तसेच जिल्ह्यांमधील गुदामांमधून धान्य दिले जाणार आहे. मार्चपासून या निर्णयाची अमंलबजावणी होणार आहे. त्यापूर्वी अंमलबजावणीत अडचणी असल्यास जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत. येत्या दोन तीन दिवसांत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या अन्नधान्य पुरवठा विभागाने सबंध देशातील धान्य वितरण सुकर व्हावे यासाठी वितरणात सुसूत्रता आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरू असून, त्याला आता अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबत सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची सोमवारी (दि. २७) ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाचे संचालक मातेश्वरी मिश्रा तसेच राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिव जयश्री भोज उपस्थित होते. या बैठकीत सर्व जिल्ह्यांना हे नियोजन देण्यात आले आहे. त्यात एखाद्या तालुक्यातील सीमेवरील गाव दुसऱ्या तालुक्याच्या गुदामाशी अंतराने जवळ असल्यास तेथून या गावाचे धान्य वितरित केले जाणार आहे तर काही गावे अन्य जिल्ह्याच्या तालुक्यांजवळ असल्यासही त्या जिल्ह्यातून या गावांचे धान्य वितरित केले जाणार आहे. त्यानुसार सर्व तालुक्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या या नियोजनानुसार एका तालुक्यातील काही गावे मात्र, दुसऱ्या तालुक्याच्या गुदामापासूनही दूर असल्याचे काही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही गावे त्याच तालुक्यात ठेवावीत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार हे अधिकारी आपला अभिप्राय अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे देणार आहेत. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊन हे नियोजन अंतिम करण्यात येणार आहे.
मार्चचा धान्य कोटा वितरित करण्यासाठी या नियोजनाचा आधार घेतला जाणार आहे. सीमेवरील गावांना कोणत्या तालुक्याच्या गुदामांमधून धान्य वितरित केले जाईल याचा अभिप्राय येत्या दोन दिवसांत द्यायचा आहे. १ फेब्रुवारीला हे नियोजन अंतिम केले जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील काही गावे ठाणे, रायगड, सोलापूर, जिल्ह्यांना जवळ आहेत. या गावांना तेथून धान्य पुरवठा केला जाईल. ग्राहकांना धान्य वेळेत मिळावे हा यामागील उद्देश आहे. - महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे