वार करून तरुणाचा खून
By Admin | Updated: May 30, 2014 04:41 IST2014-05-30T04:41:20+5:302014-05-30T04:41:20+5:30
सहा दिवसांपूर्वी रिक्षा व दुचाकीच्या अपघातामुळे झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून ५ जणांनी बारामती शहरातील तांदूळवाडी उपनगरातील तरुणाचा मध्यरात्री गळ्यावर वार करून खून केला.

वार करून तरुणाचा खून
बारामती : सहा दिवसांपूर्वी रिक्षा व दुचाकीच्या अपघातामुळे झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून ५ जणांनी बारामती शहरातील तांदूळवाडी उपनगरातील तरुणाचा मध्यरात्री गळ्यावर वार करून खून केला. आरोपींना अवघ्या दोन ते अडीच तासांत पोलिसांनी जेरबंद केले. खून झालेल्या तरुणाच्या घरी जाऊन आरोपी त्याला घेऊन आले होते. रात्री अडीचच्या सुमारास बारामती नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावाशेजारी त्याच्या गळ्यावर वार करून खून करण्यात आला. सागर रवींद्र जाधव (वय २३, रा. सध्या तांदूळवाडी, बारामती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी पप्पू बलभीम धोत्रे (वय १९, रा. कैकाड गल्ली, बारामती), बंटी कृष्णा गायकवाड (वय २०, रा. तांदूळवाडी, बारामती), ओंकार बप्पा अडागळे (वय १९, रा. गौतमनगर, बारामती), अभिषेक कोकाटे (बारामती), गणेश चव्हाण (बारामती) या ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्रभर सागर परत आला नाही. आज सकाळी त्याच्या गळ्यावर वार केलेल्या अवस्थेत नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावाशेजारी काटेरी झुडुपात त्याचा मृतदेह आढळला. उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम, सहायक पोलीस निरीक्षक भोसले, पोलीस उपनिरीक्षक एम. ए. खान, गुन्हे शोध पथकाचे अण्णा जाधव व त्यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. या प्रकरणी सागरची आई सुजाता रवींद्र जाधव यांनी फिर्याद दिली. तिने व्यक्त केलेल्या संशयामुळे तपासाची चक्रे फिरली. त्यामुळे आरोपींना दोन तासांत अटक करण्यात यश आले. गुन्हे शोध पथकाचे अण्णा जाधव यांच्यासह दशरथ कोळेकर, रावसाहेब गायकवाड, विठ्ठल कदम, काशिनाथ नागराळे, नितीन बोराडे, कल्याण खांडेकर यांनी खुनाचा प्रकार उघड झाल्याच्या काही तासांतच आरोपींना ताब्यात घेतले. (वार्ताहर)