"सोळावं वरीस मोक्याचं, आपल्याला “मोका” घ्यायचाय"; गिरीश बापटांच्या विधानानं हशा पिकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 10:06 PM2021-01-13T22:06:00+5:302021-01-13T22:14:46+5:30

महाराष्ट्र नँचरल गँस लिमीटेड (एमएनजीएल)ला पंधरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत बापट बुधवारी (दि. १३) बोलत होते.

bjp mp girish Bapat statement brought laughter in pune press conference | "सोळावं वरीस मोक्याचं, आपल्याला “मोका” घ्यायचाय"; गिरीश बापटांच्या विधानानं हशा पिकला

"सोळावं वरीस मोक्याचं, आपल्याला “मोका” घ्यायचाय"; गिरीश बापटांच्या विधानानं हशा पिकला

googlenewsNext

पुणे : येत्या वर्षभरात शहरातल्या एक लाख घरांपर्यंत नैसर्गिक वायू वाहिनी पोहोचवणार आहे. यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि इतर परवान्यांमधल्या समस्या सोडवल्या जातील, अशी माहिती पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी दिली. महाराष्ट्र नँचरल गँस लिमीटेड (एमएनजीएल)ला पंधरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत बापट बुधवारी (दि. १३) बोलत होते. बापट यांनी कंपनीच्या कामाची आणि भविष्यातील योजनांची तर माहिती दिलीच पण यावेळी यांच्या एका विधानाची चांगलीच चर्चा झाली. 

"मराठीत एक म्हण आहे. सोळावं वरीस धोक्याचं. पण मी थोडं बदलतो. सोळावं वरीस मोक्याचे. त्यामुळं आपल्याला “मोका ” घ्यायचाय. मी मोका म्हटलंय", असं विधान भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी केल्यानं एकच हशा पिकला. गिरीश बापट वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. याआधी बापट यांनी एकदा तरुणाईला संबोधित करताना केलेलं "हिरवा देठ" असं केलेलं वक्तव्य देखील गाजलं होतं. गिरीश बापट यांच्यासोबतच या पत्रकार परिषदेला एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे, कार्यकारी संचालक एस. हलदार, वाणिज्य संचालक संतोष सोनटक्के यावेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले की, एमएनजीएलच्या माध्यमातून शहरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यात मोठे यश आले आहे. शहरातील सार्वजनिक बस सेवेच्या सुमारे दीड हजार गाड्या तर पन्नास हजार रिक्षा आता पारंपरिक इंधनाऐवजी नैसर्गिक वायू वापरतात. भविष्यात हे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न आहे. कोरोना काळात 'एमएनजीएल'ने सीएसआरमधून दिलेल्या निधीमधून रिक्षाचालकांना रोख रकमेची तसेच अनेक गरजूंना आवश्यक मदत करता आली, असेही त्यांनी सांगितले.

पांडे यांनी सांगितले की, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही आता एमएनजीएलचे काम सुरु होणार आहे. या नव्या भागातील रिक्षा चालकांना 'गॅस कीट'साठी मदत केली जाणार आहे. एका गँस कीटला तीस हजार रुपये खर्च आहे. यावरील व्याज 'एमएनजीएल' भरणार आहे. सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षाला प्रति किलोमीटर १ रुपये तीस पैसे खर्च येतो तर डिझेलवरील रिक्षाचा खर्च किलोमीटरला ३ रुपये वीस पैसे आहे. शिवाय यातून वायू प्रदूषणही थांबते.

पाचशे रुपयात कनेक्शन
एका कनेक्शनसाठी सहा हजार रुपये तर एका घरापर्यंत कनेक्शन पोहोचवण्यासाठी एमएनजीएलला पंधरा हजार रुपये खर्च येतो. या पार्श्वभूमीवर केवळ पाचशे रुपयात कनेक्शन देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मोठ्या सोसायट्यांनी एकदम नोंदणी केल्यास सवलत देण्याचाही विचार करता येईल.
- राजेश पांडे.

'एमएनजीएल' देशात चौथी
दर दिवशी १० लाख क्युबीक मीटर वायूचा पुरवठा एमएनजीएलतर्फे सध्या केला जातो. नैसर्गिक वायू क्षेत्रात देशात असणाऱ्या चाळीस कंपन्यांमध्ये एमएनजीएल चौथ्या क्रमाकांवर आहे. पुण्यात ३ लाखांपेक्षा जास्त घरगुती जोडण्या देण्यात आल्या आहेत. तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेततल्या सतराशे गाड्या नैसर्गिक वायू वापरतात. शिवाय, चाकण तळेगाव औद्योगिक वसाहतीमधल्या २२० उद्योगांनाही वायू पुरवठा केला जातो.
 

Web Title: bjp mp girish Bapat statement brought laughter in pune press conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.