“बैल एकटा येत नाही, जोडीनं येतो अन् ते पण नांगरासकट”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 21:14 IST2022-05-31T21:14:21+5:302022-05-31T21:14:56+5:30
नांगर कुणासाठी तर बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांसाठी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

“बैल एकटा येत नाही, जोडीनं येतो अन् ते पण नांगरासकट”: देवेंद्र फडणवीस
पिंपरी : चिखली जाधववाडी येथील बैलगाडा शर्यतीच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे कुर्ता जॅकेट आणि पायजमा असा वेश परिधान करून आले होते. त्यावेळी मुळशी पॅटर्नचा संदर्भ देत, “बैल कधी एकटा येत नाही, जोडीनं येतो, अन् ते पण नांगरासकट”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्यलाट उसळली. “नांगर कुणासाठी तर बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांसाठी”, असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट केला.
पिंपरी-चिंचवड शहरात चिखलीत बैलगाडा शर्यत झाली. त्यासाठी फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नेहमी सूटा-बुटात दिसणारे फडणवीस कुर्ता-जॅकेट आणि पायजमामध्ये दिसले. या अनोख्या पेहारावाचे कारण त्यांनी कार्यक्रमात सांगितले.
फडणवीस म्हणाले, “आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यतीसाठी मला कपडे शिवून दिले आणि घालायला लावले. शर्यतीत बैलांना झूल घालत नाहीत, कारण त्यांना पळायचे असते. मात्र, मुख्य अतिथींना झूल घालून मिरवायला लांडगे यांनी लावले.” त्यावर उपस्थितामध्ये जोरदार हास्यलाट उसळली. त्यानंतर पेहरावाबद्दल आणखी एक किस्सा सांगितला. फडणवीस म्हणाले, “माझ्या मित्राने मला प्रश्न विचारला. आज तुम्ही आणि लांडगे यांनी एकसारखा पेहराव का केला आहे? त्यावर मी म्हणालो की, तुमच्या इथल्या मुळशी पॅटर्नचा डायलॉग माहिती आहे का? तर बैल कधी एकटा येत नाही, जोडीनं येतो आणि तोपण नांगरासकट. हा नांगर कुणासाठी तर बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांसाठी आहे,” त्यावर जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.