पुणे: काँग्रेस फोडा, त्यांचे लोक पक्षात आणा या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आम आदमी पार्टीने (आप) टीका केली. काहीही करून सत्ता मिळवणे या एकाच दिशेने भाजपची वाटचाल सुरू असून, काँग्रेस व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
मंत्री बावनकुळे यांनी पुण्यात रविवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मेळावा घेतला. त्यात बोलताना त्यांनी, तुम्ही काँग्रेस फोडा, त्यांच्या लोकांना पक्षात घ्या, पदांची काळजी करू नका, आम्ही पदे तुम्हालाच देणार असे सांगितले होते. त्यावर आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी त्यांना देशात अन्य कोणता पक्ष ठेवायचाच नाही अशी टीका केली. लोकशाही राज्यव्यवस्थेत विरोधी पक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र ते भाजपला द्यायचेच नाही. त्यामुळेच त्यांच्या नेत्यांकडून कायम अशी वक्तव्ये केली जातात असे किर्दत म्हणाले.
सत्ताप्राप्ती हेच भाजपचे एकमेव ध्येय झाले आहे. त्यामुळेच देशापासून ते गल्लीपर्यंत त्यांच्या पक्षात बाहेरचेच लोक सर्वाधिक दिसतात. त्यांच्या सरकारमध्येही बाहेरून आलेल्यांना मंत्री केले जाते. नेत्यांबरोबरच आता कार्यकर्त्यांनाही भाजप दरवाजे खुले केले जात आहेत. काँग्रेस व त्यांच्यात हिंदुत्वाचा मुद्दा वगळता अन्य काहीही मतभेद नाहीत. शिक्षण, आरोग्य, रोजगार या विकासाच्या मुद्द्यांवर काँग्रेस व भाजपच्या कामगिरीत काहीही फरक नाही अशी टीका किर्दत यांनी केली.