भाजपा सरकार म्हणजे शेतकऱ्यांना कंगाल करणारी चोरांची टोळी : राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 16:32 IST2019-03-07T16:10:00+5:302019-03-07T16:32:33+5:30
आम्हाला तुमची भीक नकोय, आमच्या घामाचे हक्काचे पैसे हवे आहेत..

भाजपा सरकार म्हणजे शेतकऱ्यांना कंगाल करणारी चोरांची टोळी : राजू शेट्टी
बारामती (सोमेश्वरनगर) : हमीभाव हजार- बाराशे रुपयांनी कमी देऊन एकरी दोन हजार रुपये देत आहेत.शेतकऱ्यांचे खिशे कापून त्यांनाच परत पैसे देत केंद्र सरकार काय उपकार करत नाही. हे सरकार म्हणजे शेतकऱ्यांना कंगाल करणारी ही चोरांची टोळी आहे, असल्याचा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला.
बारामती तालुक्यातील निंबुत येथे बाबलाल साहेबराव काकडे विद्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाम काकडे होते. यावेळी सतीश खोमणे, पृथ्वीराज जाचक, शहाजी काकडे, सतीश काकडे, प्रमोद काकडे, आर. एन.शिंदे, नीता फरांदे, सविता काकडे, नीलिमा जगताप, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध बस थांब्याचे उदघाटन, तसेच सायकलींचे वाटप शेट्टी त्यांच्या हस्ते पार पडले.
शेट्टी म्हणाले, सरकारने ठरवून दिलेला हमीभाव कमी देत आहेत, हमीभाव आणि बाजारभाव यात हजार ते बाराशे रुपयांचा फरक पडत आहे. आम्हाला तुमची भीक नकोय, आमच्या घामाचे हक्काचे पैसे हवे आहेत, असी नेहमीच संघटनेची मागणी राहिली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर आपण कायमच याला विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले,शिक्षणाचे सध्या बाजारीकरण झाले आहे. जिल्हा परिषद शाळांच्या गळ्याला नखं लावायचं काम सुरू आहे, अनुदानित शाळा बंद पाडायच्या आणि अनेक शिक्षण महाशयांनी खाजगी शाळा सुरू कराव्यात असाच सरकारचा उद्देश असल्याचा आरोप त्यांनी केला, शाळा बंद पडल्याने मुलांना शिक्षणासाठी लांब जावत असल्याने शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत चालली असल्याची खंत त्यानी व्यक्त केली, एकवेळ मंदिराला देणगी देऊ नका आपण शाळेला देणगी द्या, यातून उद्याची पिढी तयार होणार आहे असे आव्हान खासदार शेट्टी यांनी केले.
सोमेश्वर कारखान्यावर न्यायालयात असलेले तीन दावे केवळ अजित पवार यांच्या सांगण्यावरून माघारी घेतले, आता जर सोमेश्वर कारखान्यासह राज्यातील सर्वच कारखान्यांनी येत्या आठवड्यात व्याजासह पूर्ण एफआरपी ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग नाही केली तर सर्व कारखान्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सतीश काकडे यांनी सांगितले.