पुणे : राजकारणात कधी कोण कोणाच्या मदतीला धावून जाईल याची काही शाश्वती नाही. मदत करायची म्हटले की मग पक्षाच्या मर्यादाही आडव्या येत नाहीत. असाच काहीसा अनुभव पालिकेतील नगरसेवकांना आला आहे. पालिकेच्या प्रभाग क्र. १ धानोरी-कळसमधील भाजपाच्या एका नगरसेवकाने त्यांच्या निधीमधील दोन कोटी २० लाख रुपयांचा निधी प्रभाग क्र. ३७ मधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या विकास कामांसाठी वर्ग केला आहे. नगरसेवक आपल्याला अधिकाधिक निधी मिळविण्याकरिता धडपडत असताना दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांना निधी दिल्याची खमंग चर्चा पालिकेत सुरु आहे. भाजपचे प्रभाग क्र. १ धानोरी - कळसचे नगरसेवक मारुती सांगडे हे २०१७ मध्ये पहिल्यांदाच निवडून आले आहेत. या प्रभागात चारही नगरसेवक भाजपाचे आहेत. भाजपाच्या नगरसेवकांना प्रतिवर्षी जवळपास पाच कोटी रुपयांचा निधी अंदाजपत्रकात मिळतो आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना मात्र, दोन ते अडीच कोटींच्या निधीवरच समाधान मानावे लागत आहे. सांगडे यांनी सुचविल्यावरुन स्थायी समितीने अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली होती. परंतू, त्यांनी स्थायी समितीला तीन वेगवेगळे प्रस्ताव दिले असून त्यांच्या प्रभागातील कामांसाठी असलेला १ कोटी २० लाख रुपयांचा निधी प्रभाग क्र. ३८ ड मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकाच्या प्रभागातील विकास कामांसाठी वर्ग केला आहे. तर, एक कोटींचा निधी प्रभाग क्र. ३७ क, अप्पर इंदिरानगर मधील शिवसेनेच्या नगरसेवकाने सुचवलेल्या कामांसाठी वर्ग केला आहे. या वर्गीकरणाला स्थायी समितीने मंजुरी दिली असून हा वर्गीकरणाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.एरवी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणाºया नगरसेवकांनी अशा प्रकारे वर्गीकरण करुन पक्षाच्या पलिकडे जाऊन केलेल्या ‘मदती’ची खमंग चर्चा पालिकेत सुरु आहे. कळस-धानोरी प्रभागातील सर्व विकास कामे पूर्ण झाल्याने नगरसेवकांना निधीची आवश्यकता उरलेली नाही; त्यामुळे हा निधी थेट कात्रज, अप्पर इंदिरानगर या भागातील विरोधी पक्षांच्या नगरसेवकांच्या विकास कामांसाठी दिल्याची टीका होऊ लागली आहे.
भाजपाच्या नगरसेवकाने राष्ट्रवादी-शिवसेनेच्या नगरसेवकांना दिला २.२० कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 21:12 IST
मदत करायची म्हटले की मग पक्षाच्या मर्यादाही आडव्या येत नाहीत.
भाजपाच्या नगरसेवकाने राष्ट्रवादी-शिवसेनेच्या नगरसेवकांना दिला २.२० कोटींचा निधी
ठळक मुद्दे ‘मदती’ची खमंग चर्चा पालिकेत सुरु