‘बिटकॉईन’मधून करोडोंची फसवणूक, आठ जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 04:06 AM2018-04-05T04:06:47+5:302018-04-05T04:06:47+5:30

बिटकॉईन खरेदीतून आकर्षक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या ८ जणांना सायबर क्राईम सेलने अटक केली आहे़ यातील प्रमुख सूत्रधारासह आणखी ८ जण फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.

bitcoin Fraud | ‘बिटकॉईन’मधून करोडोंची फसवणूक, आठ जण अटकेत

‘बिटकॉईन’मधून करोडोंची फसवणूक, आठ जण अटकेत

Next

पुणे - बिटकॉईन खरेदीतून आकर्षक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या ८ जणांना सायबर क्राईम सेलने अटक केली आहे़ यातील प्रमुख सूत्रधारासह आणखी ८ जण फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणात आतापर्यंत पुण्यातील एकूण २५ जणांची २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी सायबर क्राईम सेलकडे आल्या आहेत़ पोलिसांनी आतापर्यंत अंदाजे ३२ बिटकॉईन, ७९़९९ इथर व ३८ लाख ९६ हजार रुपये रोख जप्त केले आहेत़ याशिवाय १६० बिटकॉईन, ३ लाख एमकॅप, ८० हजार इथर तपासात निष्पन्न झाले असून ते पोलिसांनी वॉलेटमध्ये हस्तांतरित केले आहे़
आकाश कांतिलाल संचेती (वय २७, रा़ मुकुंदनगर), काजल जितेंद्र शिंगवी (वय २५, रा़ महर्षीनगर), व्यास नरहरी सापा (वय ४६, रा़ भवानी पेठ), हेमंत विश्वास सूर्यवंशी (वय ५१, रा़ बाणेर), हेमंत बाबासाहेब चव्हाण (४७, रा़ साडेसतरानळी, हडपसर), अजय तानाजी जाधव (वय २१, रा़ जनकपुरी, दिल्ली), पंकज श्रीनंदकिशोर आदलाखा (वय ४०, रा़ दिल्ली), हेमंत चंद्रकांत भोपे (वय ४६, रा़ डीएसके विश्व, धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़
याप्रकरणी भीमसेन अग्रवाल (वय ६५) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यानुसार एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक पाच आरोपींना ९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बिटकॉईन गुंतवणुकीतून फसवणूक केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. त्यांनी दिल्लीतून पंकज आदलाखा यास अटक करीत त्याच्या इतर साथीदारांना अटक केली. त्यांनी मल्टीलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून २ कोटी २५ लाखांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सिंगापूर येथे गेन बिटक्वॉईन ही कंपनी आहे़ ही जीबी २१ या मुख्य कंपनीची उपकंपनी आहे़ बिटकॉईन कंपनीमध्ये १ बिटकॉईन गुंतवणुकीवर दरमहा ०.१ टक्के बिटक्वॉईन याप्रकारे १८ महिन्यांत १.८ बिटक्वॉईन परतावा देण्याचे आमिष दाखविले. हेमंत भोपे हा पुण्यातील इन्व्हेस्टमेंट सही या कंपनीमार्फत इन्व्हेस्टमेंट कशी आणि कोठे करावी, याचे सेमिनार घेत असे़ त्यातून निर्माण झालेल्या जनसंपर्काचा फायदा घेत त्याने अनेकांना गेन बिटकॉईनमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीस भाग पाडले आहे़ पंकज आदलाखा हा दिल्लीचा राहणारा असून, तो मोटीव्हेशनल स्पीकर म्हणून कार्यरत असताना त्याने अनेक एमएलएम कंपन्यांसाठी मार्केटिंग व ट्रेनिंग घेतल्याचे समोर आले आहे़ गेन बिटकॉईन कंपनीच्या योजनेच्या प्रचारासाठी त्याने पुणे, मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये तसेच दुबई येथे गेन बिटकॉईनतर्फे सेमिनार घेऊन लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे़
बिटकॉईनमध्ये परतावा न देता बाजारात काहीएक किंमत नसलेले आरोपींच्या कंपनीचे गेन बिटकॉईनन स्वत: तयार केलेले क्रिप्टो एमकॅप मार्फत परतावा दिल्याचे भासवून लोकांची करोडो रुपयांची फसवणूक केली आहे़
ही कारवाई पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, आर्थिक व सायबर सेलचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ व त्यांच्या सहकाºयांनी केली आहे़

काय आहे बिटकॉईन?
बिटकॉईन ही (क्रिप्टोकरन्सी) आभासी चलन आहे, ते दृश्य नाही. मात्र, आॅनलाईन माध्यमातून ई-बॅलेन्स स्वरूपात दिसते. त्यावर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. एक बिटकॉईनचे मूल्य सुमारे ५ लाख इतके आहे. तर, एमकॅपचे मूल्य १३ रुपये आहे़ अशाप्रकारे गुंतवणूक करून फसवणूक केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात १९, तसेच निगडी पोलिसांत ८ अशा एकूण २७ तक्रारी आल्या आहेत. तक्रारींचा आकडा शंभरी पार करू शकतो. फसवणूक झालेल्यांनी सायबर सेल शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्तप्रदीप देशपांडे यांनी केले आहे़

याप्रकरणातील प्रमुख सूत्रधार अमित भारद्वाज हा असून, तो व त्याचा भाऊ अजय भारद्वाज यांच्यासह त्यांचे साथीदार फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहे़ त्यांनाही लवकरच पोलीस पकडतील़
- रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त

Web Title: bitcoin Fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.