भुशी धरण ‘ओव्हर फ्लो’

By Admin | Updated: July 17, 2014 03:25 IST2014-07-17T03:25:34+5:302014-07-17T03:25:34+5:30

मागील ४८ तासांपासून लोणावळा शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण सकाळी ९ वाजता शंभर टक्के भरून वाहू लागले

Bhushi dam 'overflow' | भुशी धरण ‘ओव्हर फ्लो’

भुशी धरण ‘ओव्हर फ्लो’

लोणावळा : मागील ४८ तासांपासून लोणावळा शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण सकाळी ९ वाजता शंभर टक्के भरून वाहू लागले. दुपारी १.३० वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून व सत्यम, शिवम, सुंदरम रुपी पायऱ्यांवरुन पाणी वाहू लागल्याने धरण भागात आज फिरायला आलेल्या पर्यटकांनी मनसोक्त वर्षाविहाराचा आनंद लुटला. मागील वर्षी १६ जूनला धरण भरले होते. तुलनेने यावर्षी पावसाने मोठी उघडीप दिल्याने धरण तब्बल एक महिना उशिराने भरले आहे.
मागील काही वर्षांपासून लोणावळा पाऊस व पर्यटन हे एक समीकरण झाले आहे. यावर्षी पावसाने दीड महिना दडी मारल्याने धरण भरण्यास उशीर झाला होता. तरी मागील महिनाभरापासून पर्यटक धरण भरण्याची चातकाप्रमाणे वाट पहात होते़ पावसाने मागील आठवडा भरापासून शहरात कमी अधिक पावसाचा लपंडाव खेळत मागील दोन दिवसांपासून शहरात चांगली हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी केवळ ३० टक्के असलेले भुशी धरण बुधवारी सकाळी ९ वाजता शंभर टक्के भरले़
मागील २४ तासांत शहरात ९५ मिमी पावसाची नोंद झाली असून, बुधवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान तब्बल ११८ मिमी एवढा पाऊस झाला आहे़ शहरात आतापर्यंत ६८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने सरासरी वाढण्याची शक्यता आहे़ मागील वर्षी जूनअखेरपर्यंत २३१७ मिमी ऐवढा पाऊस झाला होता़
जोरदार पावसामुळे शहरातील बहुतांश सर्व लहान धरणे भरली असून, सहारा पूल धबधबा, लायन्स पॉइंट येथील गिधाड तलाव धबधबा, नाझर ओढा, आयएनएस शिवाजी जवळील डोंगरामधून वाहणारा धबधबा, खंडाळा शूटिंग पॉइंट येथील धबधबा, तसेच दुधिवरे खिंडीमधील धबधबे, तुंगार्ली भागातील धबधबे वाहू लागले आहेत़ त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी होती़ (वार्ताहर)

Web Title: Bhushi dam 'overflow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.