केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळयांचे भूमिपूजन; फ्लेक्सवर मात्र अमित शाहांचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 21:53 IST2021-12-17T21:53:02+5:302021-12-17T21:53:09+5:30
छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर छापलेच नाही

केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळयांचे भूमिपूजन; फ्लेक्सवर मात्र अमित शाहांचा फोटो
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर छापलेच नाही. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधरण सभेत महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपला घेरले. तसेच निषेध व्यक्त केला. सभागृह नेते गणेश बीडकर यांनी यासंदर्भात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दूर करू, असे सांगितल्यानंतर याबाबत चर्चा थांबली.
महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि इमारतीसमोरील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा याचे भूमिपूजन गृहमंत्री शहा यांच्या हस्ते येणार आहे. शहर भाजपकडून या कार्यक्रमासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर लावलेल्या फ्लेक्सवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे छापलेली नाही, असा आरोप करीत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभेतच आंदोलन सुरु केले. याबाबींचा निषेध करीत चर्चा करण्याची मागणी केली.
सत्ताधारी भाजपवर मनसेचे नगरसेवक वसंत मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जोरदार टीका केली. भाजपने छत्रपती शिवराय व डॉ. आंबेडकर यांचा अवमान केला आहे. तर विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी या प्रकाराबद्दल सत्ताधारी भाजपने माफी मागावी, अशी मागणी केली. आजपर्यंत सत्ता असताना, या दोन्ही महामानवांचे पुतळे का उभे राहिले नाही याचा विचार विरोधी पक्षाने केला पाहिजे. आम्ही हे काम करीत असताना याचे स्वागत करण्याऐवजी टीका करू नये असे उत्तर सभागृह नेते गणेश बीडकर यांनी दिले. तसेच सभा तहकुब करण्यात आली.