इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसरला वादळी पावसाने झोडपले; वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 10:08 PM2021-05-27T22:08:56+5:302021-05-27T22:09:22+5:30

एक तासाहून अधिक काळ वादळी वारे आणि पावसाचे तांडव सुरु होते.

Bhawaninagar, Sansar in Indapur taluka was hit by heavy rains | इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसरला वादळी पावसाने झोडपले; वीज पुरवठा खंडित

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसरला वादळी पावसाने झोडपले; वीज पुरवठा खंडित

Next

बारामती: इंदापूर तालुक्याला गुरुवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपले.सणसर भवानीनगर भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वादळाने या भागातील अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे इंदापूर रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र होते. येथील ग्रामस्थांनी वादळी वाऱ्यासह तुफानी पावसाचा अनुभव घेतला.

एक तासाहून अधिक काळ वादळी वारे आणि पावसाचे तांडव सुरु होते. तसेच पावसाने ठिकठिकाणी पाणी साठल्याने परिसराला छोट्या तळ्याचे स्वरूप आले होते.तसेच या पावसाने विजेचे खांब कोसळले. परिणामी वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात आहे. 

भवानीनगर लगतच्या शेरपूलावरील भरावावर बाभळीचे झाड पडल्याने येथे एकेरी वाहतूक सुरु आहे. भवानीनगर येथील साखर कारखान्यासमोरील तीन मोठी झाडे पडल्याने वाहतुक थांबली होती. शेवटी पोलिसांनी रस्त्यावर उतरत येथे एकेरी वाहतूक सुरळीत केली आहे. 

अनेक वर्षात प्रथमच वादळी वाऱ्यासह पाऊस अनुभवल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरु झाला. यावेळी काही काळ गारांचा देखील पाऊस सुरु झाला होता. मात्र सात वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारे वाहू लागले. काही ज्येष्ठ नागरिकांना येथील युवकांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित ठिकाणी हलवले, त्यामुळे अनर्थ टळला. पावणे आठच्या सुमारास पाऊस थांबला. त्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

दरम्यान,सणसरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस ,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शेतकऱ्याचे ऊस, मका ,कडवळ ही पिके उध्वस्त झाली आहेत.त्यामुळे गुरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. केळीसह वांगी, टोमॅटो, मिरची या पिकांचे ही पावसामुळे नुकसान झाले. एकंदरीतच अचानक आलेल्या आजच्या पावसामुळे कोरोनामुळे अडचणीत असलेला शेतकरी आणखी अडचणीत जाणार आहे. 

Web Title: Bhawaninagar, Sansar in Indapur taluka was hit by heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.