Mahavitaran | पुणे जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकाने पकडली १३ कोटींची वीज चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 11:01 IST2023-03-22T10:59:41+5:302023-03-22T11:01:24+5:30
इतर अनियमिततेच्या १०० प्रकरणांत चार कोटी २९ लाखांची बिले देण्यात आलेली आहे...

Mahavitaran | पुणे जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकाने पकडली १३ कोटींची वीज चोरी
पुणे : महावितरणच्या भरारी पथकाने फेब्रुवारीत भोसरी, शिरूर व इंदापूर येथे धाड टाकून ८ कोटी ७१ लाख रुपयांच्या ११० वीज चोरीच्या घटना उघडकीस आणल्या असून यात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. तसेच इतर अनियमिततेच्या १०० प्रकरणांत चार कोटी २९ लाखांची बिले देण्यात आलेली आहे.
उघडकीस आलेल्या वीज चोरीमध्ये स्टोन क्रशर व प्लास्टिक इंडस्ट्री अशा औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. यात तीन मोठ्या वीज चोरीची प्रकरणेही उघडकीस आलेली आहे. या ग्राहकाविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. पुणे शहर भागातील भोसरी परिसरात भरारी पथकाने धाड टाकून स्टोन क्रशर कंपनीची वीज चोरी उघडकीस आणलेली आहे. या औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याचे तपासात उघड झाले असून सदर ग्राहकास ८ लाख ३८ हजार युनिटचे एक कोटी ६६ लाख ९२ हजार रुपयांचे वीज चोरीचे बिल देण्यात आले आहे. तसेच या ग्राहकाविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत शिरूर परिसरात भरारी पथकाने धाड टाकून प्लास्टिक इंडस्ट्रीची वीज चोरी उघडकीस आणलेली आहे. सदर औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून ५ लाख ६ हजार युनिटची वीज चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या ग्राहकाला ८५ लाख ३० हजार रुपयांचे वीज चोरीचे बिल देण्यात आले आहे. तसेच इंदापूर परिसरात भरारी पथकाने धाड टाकून आइस फॅक्टरीची वीज चोरी उघडकीस आणलेली आहे. या औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून २ लाख ८५ हजार युनिटची वीज चोरी केल्याचे तपासात आढळून आले असून त्याला ५१ लाख ६९ हजार रुपयांचे वीज चोरीचे बिल देण्यात आले आहे.