Video : अग्निशमन दलाच्या जवानांसाठी भाऊबीज; भोई प्रतिष्ठानचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 13:47 IST2018-11-09T13:45:18+5:302018-11-09T13:47:00+5:30
वर्षभर चोवीस तास नागरिकांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांसाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान तर्फे भाऊबीज समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

Video : अग्निशमन दलाच्या जवानांसाठी भाऊबीज; भोई प्रतिष्ठानचा उपक्रम
पुणे : वर्षभर चोवीस तास नागरिकांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांसाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान तर्फे भाऊबीज समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे या उपक्रमाचे 24 वे वर्ष होते. खासदार अनिल शिरोळे, जेष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, कारागृह विभागाचे विशेष पोलीस अधीक्षक विठ्ठल जाधव तसेच अनेक पुणेकर उपस्तिथ होते.
भोई प्रतिष्ठानच्या महिला कार्यकर्त्यांकडून पुणे अग्निशामक दलाच्या जवानांचे औक्षण करण्यात आले. तसेच यावेळी मुस्लिम औकाफ वेलफेअर ट्रस्टच्या वतीने उपस्थितांना शिरखुर्म्याचे देखील वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. रजेवर असताना देखील आपले कर्तव्य बजावत नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या जवानांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी आपल्या मनोगतात अनिल शिरोळे म्हणाले, भोई प्रतिष्ठानच्या कार्यातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळते. समाज सुखी होत नाही तोपर्यंत आपण सुखी होत नाही. दुःखितांच्या दुःखात सहभागी होण्याचं काम भोई प्रतिष्ठान करते. तर उल्हास पवार म्हणाले, नवीन उपक्रम मिलिंद भोई नेहमी करत असतात. अनेक अग्निशमन दलाच्या जवानांनी सुट्टीवर असताना देखील कर्तव्य बजावून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. नेहमी नागरिकांच्या सेवेसाठी अग्निशमन दलाचे जवान आपले कर्तव्य बजावत असतात.