सावधान! HIV चा धाेका अजुनही संपलेला नाही; पुण्यात ३ महिन्यांत २८४ जण बाधित
By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: May 14, 2023 17:06 IST2023-05-14T17:05:39+5:302023-05-14T17:06:11+5:30
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या तीन महिन्यांतील आकडेवारी वाढलेली दिसून आल्याने ‘एचआयव्ही’ चा धाेका वाढला

सावधान! HIV चा धाेका अजुनही संपलेला नाही; पुण्यात ३ महिन्यांत २८४ जण बाधित
पुणे: पुणे महापालिका क्षेत्रात यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत २८४ जणांना ‘एचआयव्ही’ (हयूमन इम्युनाे डेफिसिएंशी व्हायरस) ची बाधा झाली आहे. महानगरपालिकेचा एड्स सेल ने तीन महिन्यांत २५ हजार ९७० संशयितांची रक्ततपासणी केली असता त्यावरून ही धक्कादायक आकडेवारी समाेर आली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या तीन महिन्यांतील आकडेवारी प्रचंड वाढलेली दिसून आल्याने ‘एचआयव्ही’ चा धाेका वाढला आहे.
रोगांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या शरीरात राेगप्रतिकारशक्ती यंत्रणा असते. या यंत्रणेलाच ‘एचआयव्ही’ विषाणू नाकाम करताे. कालांतराने, ही राेगप्रतिकार यंत्रणा कमकुवत होते आणि रोगांचा सामना करण्याची नैसर्गिक क्षमता शरीर हरवून बसते. अशावेळेला त्या रुग्णाला विविध रोग होतात. पुढे याचे रूपांतर ‘एड्स’ (अॅक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम) या रोगात हाेते. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू हाेताे. म्हणून ‘एचआयव्ही’ ची तपासणी व गाेळया औषधे ही सरकारी रुग्णालयांत मोफत दिली जातात.
एचआयव्ही चा सर्वाधिक प्रसार हा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे हाेताे. तसेच एचआयव्ही बाधित व्यक्तीची इंजेक्शनची सुई दुस-या व्यक्तीला वापरली तर त्यामुळेही हा प्रसार हाेताे. पुणे महापालिकेच्या ‘एड्स सेल’मध्ये तीन महिन्यांत २६ हजार १०० महिला, पुरूष, तृतीयपंथी यांचे समुपदेशन करण्यात आले. येथे दररोज सरासरी 290 लोकांना एड्सच्या संदर्भात समुपदेशन केले जाते.
डॉ. सूर्यकांत देवकर, मुख्य लसीकरण अधिकारी म्हणाले, की ओपीडीमध्ये येणाऱ्या सर्व गराेदर मातांना एचआयव्ही/एड्स चाचणी करावी लागते. तसेच इतर असुरक्षित लोकांच्या चाचण्या कराव्या लागतात. कधीकधी त्यांना समुपदेशनाची आवश्यकता असते. आयुक्तांनी मान्यता दिली की आम्ही समुपदेशकांची नियुक्ती आणि नियुक्ती करू.
महिना लाेटला तरीही समुपदेशक नाहीत
महानगरपालिकेचा एड्स सेल मध्ये समुपदेशकाची महत्वाची भुमिका असते. आलेल्या संशयितांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देणे, त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे असते. परंतू, महापालिकेच्या या सेलमध्ये महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून समुपदेशक नाहीत.
जानेवारी ते मार्च दरम्यान तपासणी व आढळलेले एचआयव्ही पाॅझिटिव्ह रुग्ण
एकुण समुपदेशन - २६,१००
एकुण रक्तचाचणी - २५,९७०
पाॅझिटिव्ह पुरुष: 146
पाॅझिटिव्ह महिला: 107
पाॅझिटिव्ह मुले: १
पाॅझिटिव्ह मुली : १
पाॅझिटिव्ह तृतीयपंथी: 7
पाॅझिटिव्ह गर्भवती महिला: 6
एकुण पाॅझिटिव्ह - २८४