"हक्काचे मुख्यमंत्री असल्याने निधीची कमतरता नाही, शिवसैनिकांनी मदतीला धावून जावे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 19:54 IST2023-08-09T19:53:41+5:302023-08-09T19:54:31+5:30
यापुढील काळात गाव तिथे शिवसेना शाखेचा फलक लावला जाईल, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले...

"हक्काचे मुख्यमंत्री असल्याने निधीची कमतरता नाही, शिवसैनिकांनी मदतीला धावून जावे"
मंचर (पुणे) : शिवसैनिकांनी अंग झटकून लोकांच्या मदतीला धावून जावे. हक्काचे सरकार व मुख्यमंत्री असल्याने निधीची कमतरता पडणार नाही. यापुढील काळात गाव तिथे शिवसेना शाखेचा फलक लावला जाईल, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
आंबेगाव तालुक्यातील बूथप्रमुख व शिवदूत यांची बैठक लांडेवाडी येथे झाली. या बैठकीस शिवसेना उपनेते, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह शिवसेना जनकल्याण कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख नचिकेत खरात तसेच या विभागाचे पुणे जिल्हाप्रमुख अविनाश राऊत यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
यावेळी आढळराव पाटील यांनी शिवसैनिकांशी बोलताना गावोगावी गाव तिथे शिवसेना शाखेचा फलक लावण्यासह बूथप्रमुख व शिवदूत यांचे कार्य व जबाबदाऱ्या याबाबत संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली. शिवसैनिकांनी अंग झटकून लोकांच्या मदतीला धावून जावे. राज्याचे नेतृत्व आपल्या सर्वांच्या हक्काचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. त्यामुळे शासकीय पातळीवर कुठलीही कमतरता शिवसैनिकांना भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. बैठकीस जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, शिवसेना प्रभारी तालुकाप्रमुख संतोष डोके, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले, युवासेना जिल्हाप्रमुख प्रवीण थोरात पाटील, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मालती थोरात, ग्राहक संरक्षक कक्षाचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी राजगुरू यांच्यासह आंबेगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी व बूथप्रमुख, शिवदूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.