तब्येत नाजूक तरी साठ वर्षांची गायकी तरुण! बेगम परवीन सुलताना यांच्या गायकीने बहार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 12:03 PM2023-12-17T12:03:18+5:302023-12-17T12:03:57+5:30

आलाप घेतल्यानंतर दम लागत असल्याचे रसिकांना कळत होते, तरीदेखील बेगम परवीन सुलताना यांनी आपली पेशकश जारी ठेवली

Begum Parveen Sultana's singing has emerged as a sixty-year-old singer, despite her poor health | तब्येत नाजूक तरी साठ वर्षांची गायकी तरुण! बेगम परवीन सुलताना यांच्या गायकीने बहार

तब्येत नाजूक तरी साठ वर्षांची गायकी तरुण! बेगम परवीन सुलताना यांच्या गायकीने बहार

पुणे : तब्येत ठीक नसताना आणि केवळ पं. भीमसेन जोशी यांच्या प्रेमापोटी ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांनी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात आपली सुमधुर गायकी तासभर पेश केली. त्यांनी राग रागेश्वरी सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. आलाप घेतल्यानंतर दम लागत असल्याचे रसिकांना कळत होते, तरीदेखील बेगम परवीन सुलताना यांनी आपली पेशकश जारी ठेवली. त्यामुळे रसिकांनी शेवटी उभे राहून अभिवादन करत टाळ्यांचा कडकडाट केला.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी पतियाळा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांना शनिवारी महोत्सवाच्या चौथ्या दिवशी प्रदान करण्यात आला. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना २००७ सालापासून मंडळाच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार देत गौरविण्यात येते. रोख रु. ५१ हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडांगण येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, पंडित उपेंद्र भट, डॉ. प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

वयाच्या १६ वर्षांपासून बेगम परवीन सुलताना गायन करत आहेत. त्या आजारी असतानाही त्यांनी तासभर आपली सेवा पेश केली. शेवटी त्यांनी ‘भवानी दयानी’ सादर करून उपस्थितांना आपल्या गायनाने आबाद केले.

बेगम परवीन सुलताना म्हणाल्या, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे माझ्या मोठ्या भावासारखे होते. आज वत्सलाबाई जोशी या माझ्या वहिनीच्या नावाने मला पुरस्कार मिळतोय ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. या पुरस्काराने मला आणखी चांगली कामगिरी करायची ऊर्जा मिळाली आहे, आणि जबाबदारीदेखील वाढली आहे. वत्सलाबाई जोशी यांच्या हातचे पोहे मी अनेकदा खाल्ले आहेत. पोहे जेव्हा छान होत तेव्हा ‘पोहे सूर में बने है...’ अशी दाद आम्ही सर्वच जण देत असू, अशी आठवणदेखील बेगम परवीन सुलताना यांनी सांगितली.

Web Title: Begum Parveen Sultana's singing has emerged as a sixty-year-old singer, despite her poor health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.