Pune Crime: 'चांगला राहत जा', सांगणार्या वडिलाचा मुलाने केला खून, पुण्यातील घटना
By विवेक भुसे | Updated: September 19, 2023 11:09 IST2023-09-19T11:08:24+5:302023-09-19T11:09:15+5:30
झोपलेल्या वडिलांवर केला हल्ला

Pune Crime: 'चांगला राहत जा', सांगणार्या वडिलाचा मुलाने केला खून, पुण्यातील घटना
पुणे : काम धंदा करत जा, चांगला राहत जा असे सांगणार्या वडिलांच्या छातीत कात्रीने मारुन त्यांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. झोपत असलेल्या वडिलांवर हल्ला करुन त्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे.
लक्ष्मण मंजुळे (वय ५५, रा. टिंगरेनगर) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी मुलगा शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय २०) याला अटक केली आहे. ही घटना टिंगरेनगरमध्ये सोमवारी पहाटे दीड वाजता घडली.
याबाबत लक्ष्मण यांचे मेव्हणे बाबु रामु दांडेकर (वय ३६, रा. टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मंजुळे हे सध्या आजारी असतात. शिवनाथ मंजुळे हा अकरावीपर्यंत शिकला असून सध्या काही कामधंदा करत नाही. ते शिवनाथ याला नेहमी काही तरी कामधंदा करत जा. अंघोळ करत जा, चांगला राहत जा, असे बोलत असत. त्यावरुन त्यांच्यात वारंवार वाद होत असत.
मंजुळे यांची विवाहित मुलगी सध्या त्यांच्याकडे बाळंतपणासाठी आली आहे. सोमवारी रात्री सर्व जण झोपले असताना शिवनाथ याने घरातील कात्री घेऊन झोपलेल्या वडिलांच्या छातीत व पोटात खुपसली. त्यांच्या ओरडण्याने त्याच्या आईला जाग आली. तिने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, त्यात कात्री हाताला लागून त्याही जखमी झाल्या आहेत. लक्ष्मण मंजुळे यांना रुग्णालयात नेले़ परंतु, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी शिवनाथ याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.