बीआरटीला ‘बँ्रडिंग’चा आधार

By Admin | Updated: September 1, 2015 04:20 IST2015-09-01T04:20:32+5:302015-09-01T04:20:32+5:30

कात्रज ते हडपसर या मार्गावर मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली बीआरटी सेवा अपयशी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर आता संगमवाडी ते विश्रांंतवाडी बीआरटीचे विविध मार्गांनी ब्रँडिंग केले जात आहे

The basis of 'branding' to BRT | बीआरटीला ‘बँ्रडिंग’चा आधार

बीआरटीला ‘बँ्रडिंग’चा आधार

पुणे : कात्रज ते हडपसर या मार्गावर मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली बीआरटी सेवा अपयशी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर आता संगमवाडी ते विश्रांंतवाडी बीआरटीचे विविध मार्गांनी ब्रँडिंग केले जात आहे. बीआरटीविषयी प्रवाशांमध्ये जनजागृती निर्माण करून त्यांना आकर्षित करण्याचा त्यामागचा उद्देश आहे. त्यादृष्टीने ‘प्रवास नवा, पर्याय नवा’ ही स्लोगन तयार करून रेडिओवरून जाहिराती सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच संकेतस्थळ, ब्लॉग व फेसबुक पेजच्या माध्यमातूनही बीआरटीला लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे. काही दिवसांत शहरांतील होर्डिंग्जवरही बीआरटी झळकणार आहे.
पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका व पुणे महानगर परिवहन महामंंडळाने (पीएमपी) नव्याने सुरू केली जाणारी बीआरटी यशस्वी करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न सुरू आहेत. आधीची बीआरटी अपयशी ठरल्याने प्रवासी व नागरिकांची नकारात्मक मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या मार्गांविषयीही शंका उपस्थित केली जात आहे. यावर मात करण्यासाठी आणि बीआरटी अधिक सक्षमपणे चालविण्यासाठी बीआरटी विविध मार्गांनी ब्रँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी बीआरटीला ‘रेनबो बीआरटी’ असे आकर्षक नाव देऊन लोगोही तयार करण्यात आला. ही बीआरटी आता रेनबो बीआरटी म्हणूनच ओळखली जाणार आहे.
या बँ्रडिंगची जबाबदारी सोपविण्यात आलेले पुणे महापालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी ‘लोकमत’शी बोलताना याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, की नवीन बीआरटी लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विविध माध्यमांतून ही प्रसिद्धी सुरू आहे. रविवारपासून रेडिओवरून जाहिराती सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच या बीआरटीविषयी प्रवाशांच्या प्रतिक्रियाही रेडिओवरून प्रसारित केल्या जाणार आहेत. पुढील काही दिवस या जाहिराती सुरू राहतील. रेनबो बीआरटी असे स्वतंत्र संकेतस्थळ, ब्लॉग तसेच फेसबुक पेजही सुरू करण्यात आले आहे. यावर बीआरटीविषयी सर्व माहिती छायाचित्रांसह देण्यात आली आहे.

Web Title: The basis of 'branding' to BRT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.