बारामतीच्या मॅरेथॉन धावपटू लता करेंची संघर्षगाथा ऐकून ‘इंडियन आयडॉल’चा मंच गहिवरला; परीक्षक सोनू कक्करची आर्थिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 21:30 IST2021-06-29T21:25:30+5:302021-06-29T21:30:13+5:30
लता करे २०१३ मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावल्या.

बारामतीच्या मॅरेथॉन धावपटू लता करेंची संघर्षगाथा ऐकून ‘इंडियन आयडॉल’चा मंच गहिवरला; परीक्षक सोनू कक्करची आर्थिक मदत
बारामती: बारामतीच्या मॅरेथॉन धावपटू ६७ वर्षीय लता करे यांचा नुकताच 'इंडियन आयडॉल'च्या मंचावर गौरव करण्यात आला.करे यांची संघर्षकथा ऐकुन अनेकांचे डोळे पाणावले. गायिका सोनू कक्कर यांनी १ लाख २१ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली.
करे २०१३ मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावल्या. अनवाणी धावत त्यांनी पाच हजारांचे बक्षीस मिळविले.त्यानंतर सलग तीन वर्ष त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.त्यामुळे २०१३ पासून त्या चर्चेत आहेत. बारामतीमधील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असताना त्यांच्या पतीचे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निधन झाले.
पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या वयातील जिद्द आणि यश पाहुन त्यांच्या जीवनावर चित्रपट देखील काढण्यात आला आहे. 'लता भगवान करे, एक संघर्षकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे.या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.
शोमध्ये करे या शोमध्ये स्पर्धक असलेल्या पवनदीप राजन या स्पर्धकाला सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या मुलासह सहभागी झाल्या होत्या. करे यांनी केलेल्या फर्माईशवर गायक पवनदीप राजन याने जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जित है हे गाणे गायले.