"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:11 IST2026-04-06T14:09:50+5:302026-04-06T14:11:22+5:30
Baramati By Election 2026 : दादांसाठी बारामती आई प्रमाणे होती. बारामतीचा प्रत्येक नागरीक हा दादांसाठी पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास होता. बारामती हा दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला."

"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
बारामतीकरांच्या विकासासाठी आणि अजित दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझे दुःखही तळघरात कोंडले आणि अत्यंत धिराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकरांकडे बघूनच आला आहे. तुमचे प्रेम, तुमचा पाठिंबा आणि तुमची साथ हीच माझी शक्ती आहे. हे मी नम्रपणे कबूल करते. गेल्या ३५-३६ वर्षांत आपण अजित दादांना प्रचंड मतांनी निवडून दिले आहे. दादांसाठी प्रत्येक बारामतीकर आपणच उमेदवार आहोत, या भावनेने निवडणूक हाती घेत असत. म्हणूनच दादांनी प्रत्येक वेळी स्वतःचेच विक्रम मोडीत काढले आहे. आपल्या मताचा बोजा माझ्यावर आहे, म्हणून मी २४ तास काम करतो, असे दादा नेहमीच म्हणायचे. त्यांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूकच नाही, तर दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची खरी संधी आहे," असे भावनिक आवाहन आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सर्वेसर्वा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना केले. त्या बारामती येथे विधानसभा पोट निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी आयोजित पक्षाच्या मेळ्याव्यात बोलत होत्या.
...म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला -
सुनेत्रा पवार म्हणाल्या, "अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी आपण अजित दादांना गमावले. यानंतर आता बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी आर्ज आज दाखल करत आहे. बारामतीत अशा पद्धतीने पोटनिवडणूक होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. दादा आपल्यात नाहीत, असे अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्यही नाही. पण नियतीने माझ्यावर, आपल्यावर ही वेळ आणली आहे. दादांचे जाणे ही केवळ माझी आणि माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हाणी नाही तर, बारामती, राज्य आणि देशाची हाणी आहे. दादांसाठी बारामती आई प्रमाणे होती. बारामतीचा प्रत्येक नागरीक हा दादांसाठी पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास होता. बारामती हा दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला."
"बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही" -
"पवार साहेबांनी बारामतीला विकासाचा दृष्टिकोण दिला आणि अजित दातांनी त्यात रंग भरले आणि जागतिक दर्जाकडे नेले. आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही, असे वचन मी बारामतीकरांना देते. बारामती तालुकाहा जगातील सर्वात विकसित आणि सर्वात प्रगत तालुका बनवणे हे दादांचे स्वप्न नव्हते तर एक ध्यास होता. त्यांना बारामती हे जागतिक दर्जाचं शहर बनवायचं होतं. मात्र त्यांना नियतिने आपल्यातून नेले. दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. मात्र, त्यांचा विकासाचा विचार पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे. ते शब्दाला जागणारे होते. त्यांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. त्यांना साक्षिला ठेऊनच मी तुम्हाला हे वचन देते," असेही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.