Dagdusheth Ganpati: हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिरात ‘दगडूशेठ’ चे बाप्पा विराजमान होणार
By श्रीकिशन काळे | Updated: June 9, 2024 18:27 IST2024-06-09T18:25:51+5:302024-06-09T18:27:07+5:30
यंदाची प्रतिकृती असलेले हिमाचल प्रदेशच्या सोलन मधील जटोली शिव मंदिर हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले मंदिर

Dagdusheth Ganpati: हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिरात ‘दगडूशेठ’ चे बाप्पा विराजमान होणार
पुणे: यंदा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. हिमालयाच्या सानिध्यात असलेल्या आणि पवित्र समजल्या जाणाऱ्या या अतिशय तेजस्वी मंदिराची प्रतिकृती करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.
हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात रविवारी (दि.८) सजावटीच्या कामाचा शुभारंभ सोहळा कलादिग्दर्शक अमन विधाते व दीपाली विधाते यांच्या हस्ते झाला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण उपस्थित होते. यंदाची प्रतिकृती असलेले हिमाचल प्रदेशच्या सोलन मधील जटोली शिव मंदिर हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले मंदिर आहे. जटोली हे नाव महादेवाच्या लांब जटावरून पडले आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आणि एक चमत्कारच आहे. पुराणातील उल्लेखानुसार भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्राम स्थान होते, असे मानले जाते.
जटोली मंदिर विशिष्ट अशा दक्षिण-द्रविड वास्तुशैलीमध्ये बांधले गेले आहे आणि ते सलग तीन पिरॅमिडने बनलेले आहे. पहिल्या पिरॅमिडवर गणेशाची प्रतिमा तर दुस-या पिरॅमिडवर शेष नागाची प्रतिमा दिसते. मंदिरातील दगडांवर थाप मारल्यावर डमरू सारखा आवाज देखील येतो.