‘कम ऑन किल मी’ वरून पेटलं राजकारण; पुण्यात दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:34 IST2025-06-23T13:33:59+5:302025-06-23T13:34:13+5:30

पुण्यात दोन्ही शिवसेनेच्या गटांमध्ये बॅनर वॉर सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Banner war between the Eknath Shinde faction and Uddhav Thackeray faction in Pune on the backdrop of Shiv Sena anniversary | ‘कम ऑन किल मी’ वरून पेटलं राजकारण; पुण्यात दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर

‘कम ऑन किल मी’ वरून पेटलं राजकारण; पुण्यात दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: पुण्यात शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार बॅनरबाजीचं युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. काल (२२ जून) एकनाथ शिंदे गटाने पुण्यात लावलेल्या उपरोधिक बॅनरला आज ठाकरे गटाने थेट प्रत्युत्तर दिलं आहे.

काल शिंदे सेनेकडून लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्र रेखाटून "Come On Kill Me" असा मजकूर लिहिण्यात आला होता. या बॅनरवर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचे चित्र दाखवत "ते बोलण्यात व्यस्त आहेत, आम्ही कामात मग्न आहोत" अशी टोकाची टीका करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात दिलेल्या वक्तव्यावरून ही टीका करण्यात आली होती.

या टीकेला आज ठाकरे गटाने प्रत्युत्तर देत नव्या बॅनरने शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे गटाने लावलेल्या बॅनरमध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पायावर माथा टेकत असल्याचा फोटो झळकवण्यात आला आहे. या फोटोखाली "निष्ठेचे विचार सोडून" असा टोला लगावण्यात आला आहे.

या बॅनरमधील दुसऱ्या भागात मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दाखवण्यात आली असून त्यात एकनाथ शिंदे वाकलेले दिसत आहेत. त्याखाली "सत्तेसाठी एक लाचार… झुक गया मैं!" असा उपहासात्मक मजकूर लिहिला आहे.

या बॅनरमध्ये एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत भोगलेल्या पदांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे, जेणेकरून सत्तेसाठी त्यांनी केलेल्या समर्पणावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. या बॅनर युद्धामुळे पुण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापले असून, शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे सेनेतला वाद आता रस्त्यावर उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढे या बॅनरबाजीत आणखी काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Web Title: Banner war between the Eknath Shinde faction and Uddhav Thackeray faction in Pune on the backdrop of Shiv Sena anniversary