Pune Corona News: पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यात 'या' पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 19:03 IST2022-01-11T19:03:05+5:302022-01-11T19:03:18+5:30
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत

Pune Corona News: पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यात 'या' पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी
पुणे : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी पुण्यात जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, वेल्हा, भोर आणि हवेली तालुक्यातील ऐतिहासिक वास्तु, गड - किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे इत्यादी ठिकाणी पर्यटनाला बंदी घातली आहे. ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या अहवाल व मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोवीड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला असून, या अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. शासनाच्या आदेशानुसार जिल्हयातील सर्व मनोरंजन उद्याने, प्राणीसंग्रहालय, वस्तु संग्रहालये, किल्ले आणि अन्य सशुल्क ठिकाणे कार्यक्रम, स्थानिक पर्यटन स्थळे पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्हयातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर व वेल्हा या तालुक्यातील ऐतिहासिक वास्तु, गड किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे इत्यादी ठिकाणी नागरिक पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात.
सदर ठिकाणी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरीकांची पर्यटकांची गर्दी होते. या पर्यटनाचे ठिकाणी खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल मोठया प्रमाणात लावण्यात आलेले असतात. सदर खाद्य पदार्थ विक्री स्टॉलवार पर्यटक विना मास्क, सामाजिक अंतर पालन करता गर्दी करतात. त्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, सामाजिक अंतराचे पालन इत्यादी कोविड अनुरुप वर्तनाचे पालन होणार नाही. त्यामुळे पुणे ग्रामीण जिल्हयात कोरोना विषाणुचा प्रसार ओमिक्रॉन व्हेरियंटसह मोठया प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तसेच पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी व कोणत्या प्रकारची जिवीत हानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश करण्याची विनंती केली आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी या सात तालुक्यात पर्यटन बंदीचे आदेश काढले.
या सात तालुक्यात 'या' ठिकाणी पर्यटनास बंदी
मावळ : भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, बेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर.
मुळशी : लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पिंपरी दरी पॉइंट, सहारा सिटी, काळवण परिसर, सहारा सिटी.
हवेली : घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण परिसर.
आंबेगाव : डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळ.
जुन्नर : शिवनेरी किल्ला, सावंड किल्ला, हडसर किल्ला, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिवटा निवारा केंद्र.
भोर : रोहडेश्वर / विचित्र गड़, रायरेश्वर किल्ला, भाटघर धरण परिसर, निरादेवघर आंबवडे, भोर राजवाडा, मल्हारगड
वेल्हा : तोरणा किल्ला, राजगड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण परिसर.