एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 07:51 IST2025-10-27T07:51:22+5:302025-10-27T07:51:22+5:30
प्रवेश घेतला नाही तरी अन् प्रवेश निश्चित केला तरी गैरसाेयीचे ठरण्याची भीती विद्यार्थ्यांच्या मनात

एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
पुणे : बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस प्रवेशासाठीच्या कॅप फेरी तीनचा निकाल शनिवारी जाहीर झाला; परंतु एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशाच्या कॅप फेरी तीनचा निकाल जाहीर हाेण्याआधीच सदर निकाल हाती आल्याने विद्यार्थी गाेंधळात आहेत. कारण, प्रवेश घेतला नाही तरी अन् प्रवेश निश्चित केला तरी गैरसाेयीचे ठरण्याची भीती विद्यार्थ्यांच्या मनात आहे.
सीईटी कक्षाच्या माहितीनुसार, एमबीबीएस कॅप फेरी ३ साठी सरकारी महाविद्यालयांमध्ये १३९ जागा आणि खासगी महाविद्यालयांमध्ये (राज्य कोटा) ३०३ जागा उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त २९७ संस्थात्मक कोट्यातील एमबीबीएस जागादेखील उपलब्ध आहेत; पण राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांनी १७ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या सूचना २२ नुसार कॅप फेरी-३ च्या वाटप केलेल्या जागेसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे अनिवार्य आहे. कारण, सदर उमेदवारांचा पुढील फेरीसाठी विचार केला जाणार नाही. एमबीबीएसची संधी न घेता उपलब्ध बीएएमएस किंवा बीएचएमएसला प्रवेश घ्यावा लागणार आहे
नेमका कुठे प्रवेश घ्यावा याचा संभ्रम
बीएएमएस अभ्यासक्रमाच्या कॅप फेरी-३ चा निकाल एमबीबीएस प्रवेशाच्या कॅप फेरी-३ पूर्वी जाहीर केल्याने हा गाेंधळ निर्माण झाला आहे.
कॅप फेरी-३ मध्ये बीएएमएस कॉलेज वाटप केल्यास सदर उमेदवार पुढील कोणत्याही फेरीत सहभागी होण्यास अपात्र ठरेल, या निर्णयाबाबत विद्यार्थी, पालक नाराजी व्यक्त करीत आहेत.
विद्यार्थी म्हणतात...
स्पर्धा प्राधिकरण या समस्येची दखल घेईल का?
विद्यार्थ्यांना योग्य संधी देईल का?
बीएएमएससाठी कॅप फेरी-४ मध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल का?
एका पालकाने सांगितले की, सरकारी बीएएमएस महाविद्यालयांमध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या उच्च क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत एमबीबीएस मिळण्याची शक्यता आहे. तथापि, एमबीबीएस निकाल उशिरा लागल्याने, त्यांनी रिक्त केलेल्या जागा तिसऱ्या फेरीत काही बीएएमएस महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या उच्च क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार नाहीत. एमबीबीएस प्रवेशाच्या निकालांना विलंब हाेणे, यात विद्यार्थ्यांचा दोष नाही, एमबीबीएस प्रवेशामुळे रिक्त झालेल्या बीएएमएस जागा फक्त उच्च क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाच उपलब्ध असाव्यात. कारण एमबीबीएस ही सर्वोच्च प्राधान्य शाखा आहे. विलंबामुळे उच्च क्रमांकाच्या पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये -एक पालक