Pune Crime: लग्नास टाळाटाळ, शिवीगाळ आणि नंबरही ब्लॉक; तरुणीची आत्महत्या
By नारायण बडगुजर | Updated: December 25, 2023 20:18 IST2023-12-25T20:16:37+5:302023-12-25T20:18:59+5:30
प्रियकर मागील अडीच ते तीन महिन्यांपासून तरुणीला त्रास देत होता...

Pune Crime: लग्नास टाळाटाळ, शिवीगाळ आणि नंबरही ब्लॉक; तरुणीची आत्महत्या
पिंपरी : प्रियकर असलेल्या होणाऱ्या पतीच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मावळ तालुक्यातील वराळे येथे दि. १६ डिसेंबर रोजी ही घटना घडली. प्रियकर मागील अडीच ते तीन महिन्यांपासून तरुणीला त्रास देत होता.
अनिषा रणजित खंडागळे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या आईने याप्रकरणी रविवारी (दि. २४) तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अभिजित अनिल राठोड (रा. सायन रुग्णालय कामगार चाळ, मुंबई) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अभिजित राठोड याने प्रेम करण्याचे नाटक करून अनिषाला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. लग्नाची स्वप्ने दाखविली. मात्र, लग्नास टाळाटाळ केली. तसेच त्याने तिच्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. तिला शिवीगाळ करून मोबाइल नंबर ब्लाॅक करणे, तिच्याशी अबोला धरणे, असे कृत्य करून मानसिक त्रास दिला. या नैराश्यातून तिने घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अभिजितच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.