पुणे विभागातही रेल्वेची स्वयंचलित सिग्नल प्रणाली, आता शहरातूनही रेल्वे जाणार भरधाव

By अजित घस्ते | Published: November 28, 2023 07:22 PM2023-11-28T19:22:14+5:302023-11-28T19:22:14+5:30

शहरातून जातानादेखील रेल्वे सुसाट धावणार आहे...

Automatic signal system of railways also in Pune division, trains will run from the city too | पुणे विभागातही रेल्वेची स्वयंचलित सिग्नल प्रणाली, आता शहरातूनही रेल्वे जाणार भरधाव

पुणे विभागातही रेल्वेची स्वयंचलित सिग्नल प्रणाली, आता शहरातूनही रेल्वे जाणार भरधाव

पुणे : जुन्या सिग्नल प्रणालीमुळे हिरवा सिग्नल मिळेपर्यंत रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. परिणामी प्रवाशांचा वेळ वाया जात होता. आता मुंबईप्रमाणे पुणे विभागातही शिवाजीनगर स्थानकापर्यंत स्वयंचलित सिस्टम प्रणाली अंतर्गत प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर सिग्नल बसविले आहेत. यामुळे शहरातून जातानादेखील रेल्वे सुसाट धावणार आहे.

मुंबई-पुणे या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे काही वेळा सुपरफास्ट गाड्यांना सिग्नल न मिळाल्याने विलंब होत असे. एक्स्प्रेस गाड्यांना पासिंग मिळण्यासाठी दोन स्थानकांपूर्वीच इतर गाड्यांना थांबा घ्यावा लागतो. पासिंग दिल्यावर इतर गाड्यांना हिरवा सिग्नल दिला जातो. त्यानंतर गाड्या पुढे धावतात. मात्र, स्वयंचलित सिग्नल प्रणालीमुळे गाड्यांना जास्त वेळ थांबा घेण्याची गरज नाही.

एक्स्प्रेस रेल्वे लाइनवरील गाड्याही केवळ एक किमी अंतरावर थांबू शकतील. त्यामुळे गाड्यांचा वेळ वाचणार असून, प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने फायदेशीर होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रणालीचे फायदे काय?

- स्वयंचलित सिग्नल प्रणालीमुळे रेल्वे लाइनची क्षमता वाढणार आहे. स्थानकावर थांबा घेण्याऐवजी आता रेल्वे लाइनवर दर एक किलोमीटरवर गाड्या थांबा घेऊ शकतात. त्यामुळे पाच किमी अंतरावर पाच गाड्या थांबू शकतात. परिणामी रेल्वे स्थानकावर गाड्यांची होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

गाड्यांचा वाढणार वेग :

स्वयंचलित सिग्नल प्रणालीमुळे रेल्वेगाड्या सुरक्षित आणि वेगाने धावण्यास मदत होईल. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार पुणे-लोणावळा दरम्यान लोकलची तसेच मुंबईला गाड्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होण्यास मदत होणार आहे.

पुणे रेल्वे विभागात पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावरील शिवाजीनगर-खडकी स्टेशनदरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीच्या विविध तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला होता. आता सेवा सुरळीत सुरू आहे. नव्या प्रणालीमुळे गाड्यांना थांबा घेण्याची गरज नाही. पुणे-लोणावळा आणि मुंबई दरम्यान गाड्यांची संख्या वाढू शकते. रेल्वेगाड्यांचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

- रामदास भिसे (आयआरटीएस), जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग

Web Title: Automatic signal system of railways also in Pune division, trains will run from the city too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.