लेखकांकडेच आता सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य उरले नाही : अशोक वाजपेयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 20:06 IST2018-09-27T20:05:37+5:302018-09-27T20:06:47+5:30
लेखक हे स्वातंत्र्याचे रखवालदार असतात. लेखक सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात. पण, कित्येकदा ते आपणच सांगितलेल्या सत्यविषयी साशंक असतात....

लेखकांकडेच आता सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य उरले नाही : अशोक वाजपेयी
पुणे : मैं सच लिखता हूँ, लिखकर सब झुठा करता हूँ असे म्हणणाऱ्या लेखकांकडेच आता सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. त्यामुळे साहित्याला मर्यादा पडत आहेत. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात खोटेपणा इतका ठासून भरला आहे. त्यामुळे सत्य हेच आता अल्पसंख्यांक झालंय, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक वाजपेयी यांनी गुरूवारी व्यक्त केली.
पेन इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये लिटरेटचर अँड फ्रीडम या विषयावर वाजपेयी यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर अध्यक्षस्थानी होते. पेन इंटरनॅशनल काँग्रेसचे निमंत्रक डॉ. गणेश देवी आणि गीताली वि. म. या वेळी उपस्थित होत्या.
वाजपेयी म्हणाले, आपल्याला राजकीय स्वातंत्र्य उशिरा मिळाले. मात्र, स्वातंत्र्यापूर्वीच्या वसाहतवाद काळातही कला आणि साहित्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी स्वातंत्र्य घेतले होते. स्वातंत्र्य ही एक प्रकारची प्रेरणा आहे. आपल्याला हवे ते लिहिण्यासाठी लेखक स्वतंत्र असले पाहिजेत. राजकीय, आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य मिळते पण आत्मिक स्वातंत्र्य मिळेलच असे नाही. लेखक हे स्वातंत्र्याचे रखवालदार असतात. लेखक सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात. पण, कित्येकदा ते आपणच सांगितलेल्या सत्यविषयी साशंक असतात. आध्यात्मिक आणि राजकीय व्यक्ती बेमालूमपणे खोटे हेच सत्य असल्याचे ठासून सांगतात. जीवनाच्या सर्व क्षेत्रात खोटेपणा इतका ठासून भरला आहे की आता सत्य हेच अल्पसंख्य झाले आहे. राजकारण आणि माध्यमांनी लोकांनी सारे काही विसरावे यासाठीच मोहीम राबवित आहेत. मैं सच लिखता हूँ, लिखकर सब झुठा करता हूँ असे म्हणणाऱ्या लेखकांकडेच आता सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. त्यामुळे साहित्याला मर्यादा पडत आहेत. आपण द्वितीय श्रेणीचे नागरिक असल्याची भावना मुस्लीमांमध्ये वाढताना दिसून येत आहे. हिंसक घटनांच्या वाढीमुळे सत्य बोलण्याचे धाडस दुर्मीळ झाले आहे. कलात्मक स्वातंत्र्य उपयोगात आणत लेखकांनी असहिष्णू समाजाविरोधात सत्य, स्वातंत्र्य आणि धैयासार्ठी जागर केला पाहिजे.
कुमार केतकर म्हणाले, ज्या जमावाने गांधीजींचा खून केला तेच आज सत्तेवर आहेत. नथुरामच्या त्यागाचा गौरव केला जात आहे. गांधी आणि नेहरू यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या स्मृती जगविण्यासाठी सेवाग्राम येथील काँग्रेसच्या बैठकीला परवानगी नाकारली गेली. मात्र, ही बैठक काँग्रेस पक्षाची नव्हती. 'लिबर्टी'ची जागा 'प्रॉपर्टी'ने घेतली आहे.