‘सरस्वती सन्मान’प्राप्त साहित्यिकाचाच संमेलनाला विसर! शरणकुमार लिंबाळे यांना निमंत्रणच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:27 AM2021-11-22T11:27:02+5:302021-11-22T11:28:37+5:30

‘सनातन’ या कादंबरीसाठी शरणकुमार लिंबाळे यांचा प्रतिष्ठेच्या सरस्वती सन्मानाने गौरव करण्यात आला आहे. मात्र, त्याची दखल साहित्य संमेलनाने घेतलेली दिसत नाही. साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या पत्नी अनुराधा पाटील यांचा संमेलनात सत्कार करण्यात आला होता.

author who got the 'Saraswati Sanman' forget the conference, no invitation to Sharankumar Limbale | ‘सरस्वती सन्मान’प्राप्त साहित्यिकाचाच संमेलनाला विसर! शरणकुमार लिंबाळे यांना निमंत्रणच नाही

‘सरस्वती सन्मान’प्राप्त साहित्यिकाचाच संमेलनाला विसर! शरणकुमार लिंबाळे यांना निमंत्रणच नाही

googlenewsNext

प्रज्ञा केळकर-सिंग -

पुणे: नाशिक येथे होत असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सत्कारमूर्ती, सहभागी साहित्यिक आणि कवी यांना निमंत्रण पोहोचले. मात्र, ‘सरस्वती सन्मान’प्राप्त साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना निमंत्रित करण्याचे साधे सौजन्यही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि संयोजक संस्थेने दाखविलेले नाही. प्रस्थापितांच्या संमेलनात ठरावीक साहित्यिकांची उपेक्षा का, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जात आहे. 

‘सनातन’ या कादंबरीसाठी शरणकुमार लिंबाळे यांचा प्रतिष्ठेच्या सरस्वती सन्मानाने गौरव करण्यात आला आहे. मात्र, त्याची दखल साहित्य संमेलनाने घेतलेली दिसत नाही. साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या पत्नी अनुराधा पाटील यांचा संमेलनात सत्कार करण्यात आला होता. आता लिंबाळे यांचा सन्मान महामंडळ करणार का, याविषयी साहित्यिकांना उत्सुकता आहे.  लिंबाळे म्हणाले, ‘मी नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात २५ वर्षे होतो. याआधी नाशिकला संमेलन झाले, त्याही वेळी मला निमंत्रण नव्हते. यंदाही निमंत्रण नाही. संमेलन विशिष्ट गट, कंपूपुरते मर्यादित राहिले आहे. संमेलन सर्वसमावेशक झाले पाहिजे.  

विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार या दिग्गजांना यापूर्वी सरस्वती सन्मान मिळाला होता, तेव्हा साहित्य संमेलनात त्यांचा सत्कार करण्यात आला नव्हता. त्यामुळे आजपर्यंत असा प्रश्न उपस्थित झाला नाही. उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनात अनुराधा पाटील यांच्या सत्काराला साहित्य महामंडळाने नकार दिला होता. मात्र, साहित्यिका मराठवाड्यातील असल्याने त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. सरस्वती सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर होण्यापूर्वीच संमेलनाच्या निमंत्रण पत्रिका छापून झाल्या आहेत.
    - कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

ज्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळालेली आहे, भाषा आणि साहित्यासाठी ज्यांनी योगदान दिले आहे, त्यांनाही संमेलनात स्थान मिळाले पाहिजे. लोकांच्या पैशातून केवळ जवळच्या व्यक्तींचा सन्मान करून, त्यांना उपकृत करणे योग्य नाही. सरस्वती सन्मान नाकारणाऱ्यांचा उदो उदो होतो आणि पुरस्कार स्वीकारणाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.   
    - शरणकुमार लिंबाळे, साहित्यिक. 

निमंत्रणपत्रिकेचा नाही पत्ता! 
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाच्या आयोजनाबाबत काही विशिष्ट नियम, परंपरा आणि संकेत घालून दिले आहेत. त्यानुसार संमेलनाचे स्थळ, कालावधी, संमेलनाध्यक्ष, उद्घाटक, स्वागताध्यक्ष आणि अन्य सर्व बाबी निश्चित झाल्यानंतर त्या संमेलनाची निमंत्रणपत्रिका तयार केली जाते. ती निमंत्रणपत्रिका संमेलनाचे स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष, निमंत्रक स्वतः संमेलनात सहभागी होणाऱ्या मान्यवरांना आग्रहपूर्वक देतात. 

त्यांनी ते स्वीकारल्यानंतरच त्या मान्यवरांचे येणे निश्चित मानून त्याबाबतची घोषणा केली जाते. मात्र, नाशिकच्या साहित्य संमेलनात सर्वच रूढ परंपरांना फाटा देत भूमिपूजनाचा सोहळादेखील उरकून घेण्यात आला.  

साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत सर्व नियम, परंपरांची आयोजकांना माहिती दिलेली असते. ते पाळत नसतील तर आम्ही तरी काय करणार? निमंत्रणपत्रिकेसह अन्य सर्व बाबींबाबत स्वागताध्यक्ष आणि निमंत्रकांशीच बोलून बघा. 
    - दादा गोरे, उपाध्यक्ष, अखिल     भारतीय मराठी साहित्य महामंडळ   
 

Web Title: author who got the 'Saraswati Sanman' forget the conference, no invitation to Sharankumar Limbale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.