बारामती: धार्मिक तेढ निर्माण करणारे स्टेटस सोशल मिडीयावर ठेवणाऱ्या युवकावर अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार यांनी कडक कारवाई केली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीसांना गोपनीय बातमीदार मार्फत याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार एकाने आपल्या व्हाट्सअप स्टेटस वर औरंगजेबाचा फोटो ठेवून त्यावर धार्मिक तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर ठेवला होता.
या माहितीच्या अनुषंगाने लागलीच सदर इसमास पोलीस स्टाफच्या मार्फत ताब्यात घेण्यात आले. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यावर गोपनीय माहितीनुसार औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा फोटो व आक्षेपार्ह मजकूर मिळून आला. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाच्या या कृत्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन बारामती शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. याकरिता पोलिसांनी त्याविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२७ प्रमाणे प्रस्ताव तयार केला. त्यानंतर यावर सुनावणी घेऊन सदर इसमाची कृती ही धार्मिक तेढ निर्माण करणारी असल्याचे सिध्द झाले. त्यानंतर १४ दिवसांकरीता या तरुणाची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे करण्यात आली आहे.
बारामती शहर पोलीस स्टेशनकडून बारामती शहरातील वेगवेगळ्या सोशल मीडियावर, तसेच नागरिक ठेवत असलेल्या व्हाट्सअप स्टेटसवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. त्या माध्यमातून कोणत्याही धर्मा विरुद्ध तेढ निर्माण करणाऱ्यांवर यापुढे देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास तसेच मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान मास चालु आहे. आगामी काळात हिंदू व मुस्लिम समाजाचे उत्सव येणार आहे. या उत्सवांच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह असे स्टेटस किंवा अफवा पसरवणाऱ्या मजकुराचा संदेश कोणत्याही धर्माच्या इसमाने कोणत्याही धर्मा विरुद्ध सोशल मीडियावर शेअर करू नये ,असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली.