औंध - सिंहगड बससेवेच्या मागणीची पीएमपीएमलने घेतली दखल, मात्र नागरिकांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 13:12 IST2021-03-17T13:07:51+5:302021-03-17T13:12:57+5:30
दर गुरुवारी जातात दिवसातून दोन बस

औंध - सिंहगड बससेवेच्या मागणीची पीएमपीएमलने घेतली दखल, मात्र नागरिकांनी फिरवली पाठ
सिंहगडावर जाण्यासाठी खाजगी वाहने टाळून सरकारी वाहने वापरात यावीत या उद्देशाने सिंहगड परिवार पीएमसी प्रवासी मंचच्या वतीने औंध - सिंहगड बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. पीएमपीएमएलने दखल घेत नागरिकांसाठी ही सेवा चालू केली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवेला प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पुण्यातील पर्यटन स्थळांमध्ये सिंहगड हे पर्यटकांचे आकर्षक ठरत आहे. अनेक नागरिक उत्साहाने सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर जातात. तर गडप्रेमी दररोज ट्रेकिंगसाठी जात असतात. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. शहराच्या विविध भागातून नागरिक सिंहगडावर जाऊ लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिंहगड परिवाराच्या वतीने या बससेवेची सुरुवात करण्यात आली आहे.
गुरुवारच्या औंध सिंहगड बस सेवेसाठी दोन बस तैनात करण्यात आल्या आहेत. औंध वरून - सेनापती बापट रस्ता - कर्वे रस्ता - उत्तमनगर - एनडीए यामार्गे सिंहगडावर जात आहे. सकाळी ४.४५ मिनिटांनी पहिली बस औंधवरून सुटते. तर दुसरी बस ७.१० मिनिटांनी सुटते. सिंहगडवरून पहिली बस सकाळी ५.५० मिनिटांनी सुटते. तर दुसरी बस ८.३० मिनिटांनी निघते.