झडती अंमलदारावर गुंडांच्या टोळीचा हल्ला
By Admin | Updated: May 24, 2014 04:57 IST2014-05-24T04:57:39+5:302014-05-24T04:57:39+5:30
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका झडती अंमलदारास ५ ते ६ जणांच्या टोळक्याने रस्त्यामध्ये गाठून त्यांच्यावर हॉकी स्टिकने हल्ला चढविला.

झडती अंमलदारावर गुंडांच्या टोळीचा हल्ला
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका झडती अंमलदारास ५ ते ६ जणांच्या टोळक्याने रस्त्यामध्ये गाठून त्यांच्यावर हॉकी स्टिकने हल्ला चढविला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. ‘कपडे काढून तपासणी करतो का?’ अशी विचारणा करीत हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली. रमेश परशुराम धुमाळ (वय ४९, रा. येरवडा कारागृह कर्मचारी वसाहत) असे हल्ला झालेल्या झडती अंमलदाराचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. कारागृह प्रशासन व पोलिसांकडून हल्लेखोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी हल्लेखोरांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात भादंवि १४३, ३५३, ३३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुमाळ हे गेल्या दीड वर्षापासून येरवडा कारागृहामध्ये झडती अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. आज सकाळी ते ड्युटीवर आले होते. दुपारी नेहमीप्रमाणे ते घरी जेवायला चालले होते. कारागृहाच्या मागे कर्मचारी वसाहतीकडे जाणार्या रस्त्यावरून ते चालले होते. त्या वेळी दुचाक्यांवरून आलेल्या ५ ते ६ जणांच्या टोळक्याने त्यांना अडविले. त्यांच्या हातामध्ये असलेल्या हॉकी स्टिकने त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करताना ‘कपडे काढून तपासणी करतो का?’ असे विचारणा हल्लेखोर करीत होते. दहा ते पंधरा मिनिटे हा प्रकार चालला. त्यानंतर त्यांनी लगेच तेथून पळ काढला. धुमाळ झडती घेत असताना कुण्या कैद्याने त्यांच्याशी वादावादी केली होती का, याचा शोध कारागृह प्रशासनाकडून घेतला जात आहे. लवकरच हल्लेखोरांना शोधून काढू, असे कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले. येरवडा पोलिसांनी हल्लेखोरांचा माग काढत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. ए. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)