पुणे : हजरत अनगडशहा (अंगेरशहा बाबा) आणि संत तुकाराम महाराज यांची मैत्री हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक. याच मैत्रीचे दृश्यात्मक रूप म्हणजे अंगेरशहा बाबा यांचा भवानी पेठेतील दर्गा. संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या वाटेवर पुण्यात निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामासाठी दाखल झाल्यानंतर दोन्ही संतांच्या मैत्रीचा भावबंध अनुभवण्यासाठी वारकऱ्यांची पावले मंदिर आणि दर्ग्याकडे वळतात; तेव्हा या दोन्ही संतांचीही भेट आपसूक घडते. पालखीच्या काळात या संतांच्या मैत्रीचा सुगंध दरवळतो.
हा हिंदू-मुस्लीम सलोखा जपण्याचा प्रयत्न वारीच्या काळात आजही होत आहे, हे त्यातील विशेष ! संत तुकाराम महाराज आणि हजरत अनगडशहा यांच्यात मैत्री कशी दृढ झाली याची एक अख्यायिका देखील सांगितली जाते. अनगडशहा बाबा हे देहूत वास्तव्यास असताना त्यांनी संत तुकाराम महाराजांची परीक्षा घेण्याचे ठरविले. अनगडशहा बाबा त्यांच्या घरी फकीर म्हणून गेले. घरी तुकोबा नव्हते. त्यांनी दारात उभे राहून झोळी पुढे करीत भिक्षा मागितली. तुकोबांची मुलगी भागीरथी घराबाहेर आली, पण घरी अन्नाचा एक कण नव्हता. तिने झोळीत दोन हात घातले आणि झोळी पूर्ण भरून गेली. त्यांनतर अनगडशह न थांबता महाराजांच्या दर्शनास गेले.पुण्याच्या भवानी पेठेत अनगडशहा बाबांचे वास्तव्य होते. याठिकाणी बाबांची समाधी आहे. समाधी ठिकाणी असलेल्या विहिरीवर वारकरी संप्रदायातील लोक येऊन अंघोळ करीत होते. सर्वधर्मसभावाची शिकवण इथे बाबांनी दिली. भवानी पेठेतील या चौकाला अंगेरशहा बाबा चौक, असे नावही देण्यात आल्याचे माजी नगरसेवक वीरेंद्र किराड यांनी सांगितले.
पुण्यात तीनशे वर्षांहून अधिक काळ हिंदू-मुस्लीम ऐक्याची ही परंपरा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हजरत अनगडशहा बाबा आणि संत तुकाराम यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाबद्दलच्या आख्यायिका प्रसिद्ध असून, हा इतिहास पुस्तकांमध्येही शब्दबद्ध करण्यात आला आहे. हा इतिहास कुणीही पुसू शकत नाही. जाती-जाती धर्मा-धर्मात सध्या तेढ पसरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, संत तुकाराम महाराज आणि अनगडशहा बाबा यांनी हिंदू-मुस्लीम एकतेची बीज रोवली होती. ती परंपरा पुढे चालावी, म्हणून वारकरी या समाधीचे दर्शन घ्यायला आजही येत आहेत. - जावेद खान, उन्मत्त संस्था
ज्या दिवशी पालखी पुण्यात मुक्कामी असते. त्यादिवशी अनगडशहा बाबा यांचा संदल असतो आणि ज्या दिवशी पालखी पंढरीकडे प्रस्थान करते, तेव्हा अनगडशहा बाबा यांचा उरूस असतो. - महम्मदभाई बांगीकर, अंगेरशहा बाबा दर्ग्याचे विश्वस्त