जेजुरी - कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ।। लसूण मिरची कोथिंबीरी । अवघा झाला माझा हरी ।। मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ।। सवाता म्हणे केला मला । विठ्ठल पायी गोविला गळा ।। अशा लोकप्रिय ओव्या गात माउलींच्या पालखी सोहळ्याने सकाळी ९ वाजता दौडज खिंडीतील सकाळची न्याहारी उरकली. आणि सोहळ्याने वाल्हेकडे कूच केले. सकाळी ७ वाजता तीर्थक्षेत्र खंडोबाच्या जेजुरीचा मुक्काम आटोपून संत ज्ञनेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने वाल्हयाकडे प्रस्थान ठेवले.
कुल दैवत श्री खंडेरायाच्या दशर्नाने कृत कृत्य झालेल्या वारकर्यांरनी जेजूरी नगरीचा निरोप घेऊन आद्य रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हे नगरीकडे सकाळी ७ वा. प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी ६ वाजता पालखी सोहळ्याचे मानकर्यांसह जेजुरीकरांनी माऊलींची नित्य महापूजा उरकली. यावेळी पालिकेचे पदाधिकारी ही उपस्थित होते. जेजूरीकरांनी दौंडज खिंडी पर्यन्त जात निरोप दिला. सकाळी ८ वाजता खिंडीच्या चहू बाजूच्या हिरवळलेल्या पर्वत रांगांच्या पायथ्याशी सोहळा न्याहारीसाठी विसावला.
न्याहारी उरकून ९ वाजता सोहळ्याने वाल्हयाकडे कूच केले. ११ वाजण्याच्या सुमारास सोहळा दौडज येथे विसाव्यासाठी पोहोचला. अर्ध्या तासाच्या विसाव्यात परिसरातील कवडेवाडी, पिंगोरी दौडजच्या वाडया वस्त्यावरील अबालवृधांनी माऊलींचे दर्शन घेतले. दुपारचा नैवेद्य आणि भोजनासाठी सोहळा वाल्हयाकडे मार्गस्थ झाला.