कलाकाराने भूमिका घ्यायला हवी : संभाजी भगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 20:31 IST2019-02-18T20:29:34+5:302019-02-18T20:31:03+5:30
नाटक कंपनीच्या कानदृष्टी या उपक्रमांतर्गत विविध कलाकारांशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात येते.

कलाकाराने भूमिका घ्यायला हवी : संभाजी भगत
पुणे : कलाकाराने भूमिका घ्यायला हवी, जे भूमिका घेत नाहीत ते पळवाट काढत असतात असे परखड मत लाेकशाहीर संभाजी भगत यांनी व्यक्त केले. नाटक कंपनी आयाेजित कानदृष्टी या कार्यक्रमात संभाजी भगत यांच्याशी संवाद साधण्यात आला त्यावेळी ते बाेलत हाेते. अभिनेता साईनाथ गुणवाड याने भगत यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला पुण्यातील तरुणाई माेठ्यासंख्येने हजर हाेती.
समाेर दाेन मंद प्रकाशाचे दिवे, समाेर बसलेली तरुणाई आणि सुरु असलेला लाेककलेचा शाेध असे वातावरण रविवारी संध्याकाळी सेनापती बापट रस्त्यावरील अक्षरनंदन शाळेत पाहायला मिळाले. नाटक कंपनीच्या कानदृष्टी या उपक्रमांतर्गत विविध कलाकारांशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात येते. संभाजी भगत यांच्याशी संवाद साधत असताना त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. तसेच त्यांचा लाेकशाहीर हाेण्यापर्यंतचा प्रवास उलगडण्यात आला. माणसाला माणूस म्हणून जगू द्या या मागणीसाठी आम्ही गायनातून चळवळ पुढे नेत असल्याचे भगत यावेळी म्हणाले. जात वास्तव ते आर्थिक शाेषण या सर्वबाबींवर त्यांनी सडेताेड भाष्य केले. साताऱ्यात लहानपणी आलेल्या अडचणी ते मुंबईतील भीषण वास्तव कसे हाेते हे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शिवाजी महाराजांच्या काळातील लाेककला आणि पेशवे काळात लाेककलेला येत गेलेलं वेगळं स्वरुप याबद्दल त्यांनी उलगडा केला. शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर माेहल्ला या नाटकाच्या बांधणीची कहाणीसुद्धा त्यांनी यावेळी सांगितली. कलेतली सुंदरता आपण ओळखायला हवी असेही ते यावेळी म्हणाले. लाेकनाट्यात स्त्रियांचा सहभाग देखील आता वाढत असल्याचे तसेच अवघड न लिहीता लाेकांना समजेल अशा भाषेत प्रबाेधन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.