सासवड येथे गोळीबार करुन पलायन करणाऱ्या दोन जणांना अटक, एक जण फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:21 IST2019-01-30T18:20:13+5:302019-01-30T18:21:49+5:30
पेट्रोल पंपावर गाडी आडवी लावली या कारणांवरून चिडून जावून तीन तरूणांनी गोळीबार केल्याची घटना घटली होती.

सासवड येथे गोळीबार करुन पलायन करणाऱ्या दोन जणांना अटक, एक जण फरार
लोणी काळभोर : पेट्रोल पंपावर गाडी आडवी लावली या कारणांवरून चिडून जावून तीन तरूणांनी गोळीबार केल्याची घटना घटली होती. या गोळीबारानंतर तिथून पलायन करत दिवे घाट मार्गे हडपसर येथे आरोपी येत असताना त्यांतील दोघांना लोणी काळभोरपोलिसांनी ताब्यात घेतले तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. यावेळी पोलिसांच्या अंगावर गाडी घालत पलायन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना अटक केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी निखील शिवराम लोहार ( वय २०, मुळ रा. हाळगरा, ता. निलंगा, जि.लातूर. सध्या रा. जकातनाका, भेकराईनगर, फुरसुंगी, ता. हवेली ) व हनुमंत लक्ष्मण वाघमारे ( वय १८, मुळ रा. आंध्र प्रदेश, सध्या रा. ढोलवस्ती, ऊरूळी देवाची) या अटक करण्यात आली आहे. त्यांचा तिसरा साथीदार किशोर दणाणी हा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. सदर घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सासवड ( ता. पुरंदर ) येथे घडली. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सदर बाब तात्काळ जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड यांना कळवली. वरिष्ठानी दिलेल्या निदेर्शानुसार ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार निलेश राणे, विशाल रासकर, हेमंत कामथे, दिगंबर साळुंके यांनी सदर संशयित इसम व गाडीचा शोध घेण्यासाठी सासवड - पुणे राज्यमार्गावर हॉटेल विजय समोर नाकाबंदी करत चार चाकी गाडी क्रमांक (एमएच १२ एएक्स १७४४ आलेल्या आरोपींना थांबणयाचा इशारा दिला. त्यामध्ये तिन तरूण होते. पोलीस पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला. परंतू त्यांना न जुमानता चालकाने कार पोलीस हवालदार निलेश राणे यांचे अंगावर घातली.
जिवाची पर्वा न करता आरोपींना बेड्या ठोकणाऱ्या लोणी काळभोर पोलीस पथकाला जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी २० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.