पुणे : शहरातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात दरोडेखोरांनी थैमान घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जांभुळकर चौकातील कौशल्या बंगल्यात लष्कराचे विंग कमांडर वीरेंद्र कुमार झेंडियाल यांच्या घरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या दरोड्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, पहाटे अंदाजे २.३० ते ३ च्या सुमारास दोन अज्ञात चोरटे झेंडियाल यांच्या बंगल्यात घुसले. झोपेत असलेल्या विंग कमांडर यांच्या बेडरूममध्ये घुसून त्यांच्या तोंडावर हात ठेवत त्यांना जागे केले. सोन कुठे ठेवले आहे, अशी विचारणा करत धमकी दिली की जर हालचाल केली तर परिणाम वाईट होतील. चोरट्यांच्या हातात हातोडा, हेक्सा ब्लेडसारखा रॉड होता.
विंग कमांडर यांच्या कपाटाची चावी हिसकावून घेत त्यांनी कपाट उघडले व त्यातील तब्बल ४० तोळे सोने आणि साडेआठ लाख रुपये रोख चोरून नेले. काही क्षणातच चोरटे पसार झाले. लष्कराच्या अधिकाऱ्याच्या घरी दरोडा पडल्याने पोलिस प्रशासनही हादरले आहे, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे, चोरट्यांचा माग काढण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.