पुणे: स्वारगेट आरोपी दत्तात्रय गाडे बलात्कार प्रकरणात आता विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस येत्या २, ३ दिवसात वकिलाचे नाव राज्य सरकारकडे पाठवणार आहेत. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा. तसेच या केसमध्ये आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या हेतूने राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमकावून गाडे या नराधमाने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २५) सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. गाडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने त्याला पोलिसांच्या कामकाजाबाबत माहिती असल्याने तो पोलिसांना गुंगारा देत असल्याची चर्चा शहरात होती. घटनेनंतर आरोपी शिरुरमध्ये लपून बसल्याची माहिती समोर आली. त्यांनतर त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, तसेच स्वारगेट पोलिसांनी १३ पथके शिरूरला रवाना झाली. अखेर ७२ तासांच्या कालावधीनंतर गाडेला शोधण्यात यश आले. आता या नराधमावर लवकरात लवकर कारवाई करत कठोर शिक्षा करावी अशी मागणी सर्व स्तरावरून होत होती. पुणे पोलिसांकडून विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीची मागणी करण्यात आली होती. अखेर राज्य शासनाकडून या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या गाडे याच्याविरुद्ध तांत्रिक, तसेच वैद्यकीय पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने ताब्यात घेतले आहेत. त्याची वैद्यकीय, तसेच लैंगिक क्षमता तपासणी करण्यात आली आहे. ज्या बसमध्ये त्याने बलात्कार केला, ती संबंधित बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेने ताब्यात घेतली आहे. गाडे याने त्याचा मोबाइल फेकून दिला आहे. मोबाइल जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचे मोबाइल संभाषण, तसेच त्याअनुषंगाने तांत्रिक तपास करण्यात येत आहे. त्याच तपासात गाडे स्वारगेट बरोबरच इतर बस स्थानकांत फिरत असल्याचे समोर आले आहे. एकंदर मिळालेली माहिती पाहता, गाडे याने आपल्या गुन्हेगारी कृत्यासाठी बस स्थानके हेरून ठेवली होती. जशी संधी मिळेल, तशी तो गुन्हेगारी कृत्य करत होता, असे दिसून येते.