शिक्षक भरतीसाठी इच्छुकांना ‘पवित्र’वर नोंदणीचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 20:43 IST2025-12-16T20:41:56+5:302025-12-16T20:43:09+5:30
पात्र उमेदवारांना संदेशही पाठविण्यात आला आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि एकसंध प्रणाली राबविण्याच्या उद्देशाने पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू आहे.

शिक्षक भरतीसाठी इच्छुकांना ‘पवित्र’वर नोंदणीचे आवाहन
पुणे : शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली जात असून, पात्र उमेदवारांनी वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. यासाठी शिक्षण विभागाने अधिकृत https://tait2025.mahateacherrecruitment.org.in हे संकेतस्थळ देखील दिलेले आहे.
टेट २०२४च्या प्रक्रियेनंतर आता टेट २०२५ साठी पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे. यामुळे राज्यातील हजारो पात्र शिक्षक उमेदवारांना संधी मिळणार आहे. भरतीसाठी पवित्र पोर्टल हेच अधिकृत माध्यम असणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत ही नोंदणी केली जात आहे. यासाठी पात्र उमेदवारांना संदेशही पाठविण्यात आला आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि एकसंध प्रणाली राबविण्याच्या उद्देशाने पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू आहे.
या पोर्टलवर उमेदवारांना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, टीईटी, सीटीईटी तपशील तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती ऑनलाइन भरावी लागणार आहे. तत्पूर्वी अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करणे आवश्यक आहे. यात चुकीची माहिती भरल्यास पुढील टप्प्यात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे सर्व तपशील योग्यरीत्या भरावेत, असेही आवाहन केले आहे.