Pune News | परदेशवारी केलेल्यांना ताप व पुरळ असतील तर नायडूमध्ये दाखवण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 14:58 IST2022-05-28T14:41:48+5:302022-05-28T14:58:43+5:30
पुणे महापालिका प्रशासनाकडून तयारी सुरू...

Pune News | परदेशवारी केलेल्यांना ताप व पुरळ असतील तर नायडूमध्ये दाखवण्याचे आवाहन
पुणे: मंकीपाॅक्स रुग्ण आढळलेल्या देशांत जे नागरिक जाऊन आले असतील व त्यांना ताप व पुरळ ही लक्षणे दिसून येत असतील तर त्यांनी नायडू हाॅस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करावी. या ठिकाणी या रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आला आहे.
मंकीपाॅक्स हा विषाणूजन्य आजार असून, त्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत युराेपसह १६ देशांमध्ये या आजाराचे २५०पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती जागतिक आराेग्य संघटनेने शुक्रवारी जारी केली आहे. हा आजार आपल्याकडेही येऊ शकताे, ही शक्यता गृहीत धरून केंद्राने राज्याला मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत, तर राज्याने महापालिका आणि जिल्ह्यांना सूचना पाठवल्या आहेत.
विमानतळावर स्क्रीनिंग लवकरच
परदेशातून आपल्याकडे मंकीपाॅक्सचा रुग्ण येण्याचा मार्ग हा विमानांद्वारेच आहे. म्हणून अशा बाधित देशांतून येणाऱ्या रुग्णांची लक्षणे यावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे विमानतळावर महापालिका व विमानतळ प्रशासनाकडून लवकरच स्क्रीनिंग सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांना ताप व अंगावर पुरळ आहेत, त्यांना उपचारासाठी नायडू हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे.
सध्या मंकीपाॅक्सचा एकही रुग्ण नाही. मात्र, ज्या प्रवाशांनी गेल्या तीन आठवडयांपूर्वी अमेरिका, कॅनडा, नायजेरिया, ऑस्ट्रिया आदी मंकीपाॅक्सबाधित देशांमध्ये प्रवास केला आहे व त्यांना ताप व अंगावर पुरळ आली आहे, त्यांनी पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात संपर्क साधावा. या रुग्णांसाठी नायडूमध्ये स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आला आहे. लवकरच विमानतळावर स्क्रीनिंगही करण्यात येईल.
- डाॅ. संजीव वावरे, सहायक आराेग्य अधिकारी, पुणे मनपा