भोर तालुक्यातील अँटिजेन चाचणीचे किट संपले, फक्त आरटीपीसीआर चाचणी सुरू, कोरोना रिपोर्ट येण्यासाठी बघावी लागणार दोन दिवस वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST2021-05-05T04:16:59+5:302021-05-05T04:16:59+5:30
भोर तालुक्यात अँटिजेन चाचणीचे किट संपल्यामुळे आरटी पीसीआर टेस्ट सुरू करण्यात आली आहे. आरटीपीसीआर टेस्टचे रिपोर्ट येण्यासाठी कोरोना रुग्णांना ...

भोर तालुक्यातील अँटिजेन चाचणीचे किट संपले, फक्त आरटीपीसीआर चाचणी सुरू, कोरोना रिपोर्ट येण्यासाठी बघावी लागणार दोन दिवस वाट
भोर तालुक्यात अँटिजेन चाचणीचे किट संपल्यामुळे आरटी पीसीआर टेस्ट सुरू करण्यात आली आहे. आरटीपीसीआर टेस्टचे रिपोर्ट येण्यासाठी कोरोना रुग्णांना आता दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत नक्कीच भर पडणार असून, हे रूग्ण रिपोर्ट येईपर्यंत घरात न थांबता बाहेर फिरले तर कोरोनाचा प्रसार अजून वाढवणार. या रुग्णांना घरात थांबवून ठेवणे हे आता प्रशासनाच्या पुढे नवीन आव्हान असणार आहे. त्यामुळे अँटिजेन टेस्ट सुरू करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यात १३१४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तरीसुद्धा विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. यांना रोखून ठेवण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना दिसून येत आहे. भोर शहरातील नगरपलिका शाळा एक येथे कोरोनाची टेस्ट केली जाते. मात्र मागील चार पाच दिवसांपासून अँटिजेन टेस्ट करायला किट नाहीत, त्यामुळे आता आरटीपीसीआर टेस्ट करून रुग्णांना घरी पाठवले जात आहे. कारण त्याचा अहवाल येण्यास दोन दिवस लागतात. मात्र अनेकजन बाहेर फिरतात. या फिरणाऱ्या रुग्णांना पोलीस कसे ओळखणार, हा पोलिसांच्या समोर प्रश्न आहे. त्यामुळे लवकरात लवकर अँटिजेन चाचणी सुरू करण्याची मागणी होत आहे.
अँटिजेन टेस्ट करायला किट संपल्याने टेस्ट होत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्ण खाजगी दवाखान्यात जाऊन टेस्ट करतात. यासाठी अडीच ते तीन हजार रुपये लागतात. एक तर कोरोनामुळे उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक अडचण, त्यात टेस्ट करायचा खर्च ग्रामीण भागातील लोकांना परवडणारा नाही. त्यामुळे प्रशासनाने अँटिजेन किट आणून टेस्ट सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. त्यातच भोर शहरातील कोविड सेंटरमधील रुग्णांना शहरातल्या शहरातील किंवा शहरातून बाहेरच्या दवाखान्यात घेऊन जाण्यास रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत. खासगी गाडीवाले रुग्णांना घेत नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकावाले रुग्णांची अक्षरश: लूट करताना दिसत आहेत.
याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
अँटिजेन टेस्ट करण्याचे किट संपले होते. मात्र पुढील दोन दिवसात किट येतील आणि अँटिजेन टेस्ट पुन्हा सुरु होणार आहेत. त्यामुळे लोकांची अडचण होणार नसल्याचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.