Pune Wall Collapse : पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 12:19 PM2019-06-29T12:19:06+5:302019-06-29T12:32:57+5:30

पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून मृतांच्या कुटुंबियांना ही मदत जाहीर करण्यात आली.

Announcing four lakh relief to the relatives of the dead in Pune kondhwa wall collapse | Pune Wall Collapse : पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर

Pune Wall Collapse : पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर

Next
ठळक मुद्देकोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला.पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून मृतांच्या कुटुंबियांना ही मदत जाहीर करण्यात आली.

पुणे : पुण्यातील कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोसळून 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमक दलाला ढिगाऱ्यांखालून  तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून मृतांच्या कुटुंबियांना ही मदत जाहीर करण्यात आली. पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तसेच 15 जणांचा मृत्यू झाल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. बिल्डर आणि महापालिकेतील दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर या दुर्घटनेनंतर टीका केली आहे. कोंढवा दुर्घटनेने बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर आहे हे समोर आले. बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का? हे कामगार असंघटित क्षेत्रातील आहेत म्हणून त्यांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे तसेच पुणे महापालिकेने देखील ही घटना गांभीर्याने घ्यावी अशी मागणी केली आहे. 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चव्हाण यांनी म्हटलंय की, पुण्याच्या कोंढवा परिसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद आहे. मृतांच्या व जखमींच्या कुटुंबीयांना सरकारने मदत करावी व या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 


या दुर्घटनेतील मृतांची नावे आलोक शर्मा वय 28,  मोहन शर्मा वय 20, अजय शर्मा वय 19, अभंग शर्मा  वय 19, रवी शर्मा 19, लक्ष्मीकांत सहानी वय 33, अवधेत सिंह वय 32, सुनिल सिंग वय 35, ओवीदास वय 6, सोनाली दास वय 2 , विमा दास वय 28, संगीता देवी वय 26 अशी  आहेत. हे सर्व जण बिहार आणि ओडिशामधील राहणारे आहेत. या परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या साईटवर ते काम करत होते. 


आल्कर स्टायलस ही इमारत उंचावर असून तिची संरक्षक भिंत दगडाने बांधलेली होती. 4 फुट उंच असलेली ही इमारत पाऊस आणि शेजारी सुरू असलेल्या खोदकामामुळे कोसळली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या भिंतीच्या खालच्या बाजूला मजूरांसाठी तात्पुरत्या पत्र्याच्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. या संरक्षक भिंतीच्या खालच्या बाजूला पोकलेनचा वापर करुन शोधकाम करण्यात येत होते़ वरुन पडणारा पाऊस आणि खोदकाम यामुळे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सर्व जण गाडले गेले. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या़ एनडीआरएफचे दलही त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी तातडीने ढिगारा बाजुला करुन आत अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केले. पोकलेनच्या सहाय्याने सकाळी आठ वाजेपर्यंत ढिगारा बाजूला करण्यात आला होता. एका बाजूचा काही ढिगारा काढण्याचे काम बाकी आहे. 


अग्निशामक दलाला या घटनेची माहिती मध्यरात्री 1 वाजून 50 मिनिटांनी मिळाली. अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी तातडीने तेथे पोहचले. त्यांना एक जण जिवंत आढळून आला. त्याने अग्निशामक दलाला पाहून आवाज दिला. त्याला प्रथम अग्निशमन दलाने वाचवून बाहेर काढले. त्याने मग जवानांना कोण कोण कोठे असून शकेल, याची माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन दलाने एक वाचलेला होता. त्याने आवाज दिला. त्याला प्रथम अग्निशमन दलाने तेथील ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरू केले़ त्यात एका महिलेच्या डोक्यावर पत्रा पडल्याने ती वाचली होती तिचे पाय मात्र ढिगाऱ्याखाली अडकले होते. अग्निशमन दलाने तिला बाहेर काढले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घटनास्थळी भेट दिली असून या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या बिल्डर आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.




 

Web Title: Announcing four lakh relief to the relatives of the dead in Pune kondhwa wall collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.