युगंधर ताजणे- पुणे : येरवडा कारागृहातील कैद्यांमधील एकमेकांवरील हल्ल्याच्या घटना वाढत असताना दुसरीकडे कारागृह प्रशासने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. कैद्यांच्या रागावर नियंत्रण आणण्याकरिता दोनशेहून अधिक कैद्यांना खेळ व समुपदेशनाचे धडे दिले जात आहेत. हिंसकवृत्ती कमी करण्याकरिता त्यांना खेळाच्या माध्यमातून व्यस्त ठेवण्याबरोबरच त्यांचे निरीक्षण करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात हल्ल्याच्या तीन घटना कारागृहात घडल्या होत्या. १ जुलै रोजी कारगृहात झालेल्या हल्ल्यात एक कैदी जखमी देखील झाला होता. सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरवेळी वेगवेगळ्या कारणांतून होणाºया भांडणांना आळा घालण्याचे आव्हान कारागृह प्रशासनासमोर होते. यात अनेकदा वैयक्तिक राग व मतभेद या कारणांतून एकमेकांवर हल्ला करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे या घटनांवरुन दिसून आले आहे. कैद्यांच्या दोन गटांमधील या हाणामारीमुळे याचा परिणाम कारागृहातील इतर कैद्यांवर होऊ न देता रागावर नियंत्रण नसलेल्या कैद्यांना इतर कामांमध्ये गुंतवून ठेवण्याची कल्पना पुढे आली. सध्या येरवडा कारागृहात ५८६० पेक्षा अधिक कैदी असून प्रत्यक्षात कारागृहाची क्षमता २४४९ कैद्यांना ठेवण्याची आहे. कैद्यांमधील वाढत्या रागावर नियंत्रण मिळविण्याकरिता विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यात कैद्यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. व्हॉलिबॉल, कॅरम, बुद्धिबळ, याबरोबरच खो-खो यासारख्या खेळांना जाणीवपूर्वक प्राधान्य दिले आहे. खेळाबरोबरच समुपदेशनावरदेखील भर दिला असून, कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून मानसिक संतुलन व्यवस्थित राखण्याकरिता मार्गदर्शन करण्यात येते. .....अनेकदा कैदी वेगवेगळ्या प्रकारे खेळात अडचणी आणून तो खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करतात. कारण नसताना व्हॉलिबॉल पंक्चर करणे, खेळण्याकरिता दिलेल्या साधनांची मोडतोड करणे, एकमेकांना बोलणे, यासारखे प्रकार या वेळी दिसून येतात. ........मात्र त्यांनी तसे केल्यास ‘गांधीगिरी’च्या शिकवणुकीप्रमाणे त्यांना पुन्हा नवीन साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. कैद्यांमधील रागाची भावना कमी व्हावी, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. यापुढील काळात कैद्यांमध्ये वादविवाद व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यावर भर दिला जाणार आहे. ..कैद्यांमधील रागावर नियंत्रण मिळवायचे असल्यास त्यांच्यात सकारात्मकता आणावी लागेल. म्हणून त्यांना खेळ व प्रेरणात्मक व्याख्यानाचे धडे देण्याची कल्पना सुचली. आता व्हॉलिबॉल खेळणाºया कैद्यांचे दहा संघ तयार केले. याशिवाय कॅरम, बुध्दिबळ या खेळांचा समावेश उपक्रमात केला आहे. दररोज हे खेळ खेळण्यास त्यांना सांगितले जात आहेत. कैद्यांवर नियंत्रण मिळवणे अवघड गोष्ट असल्याने त्यांच्यात खेळाची गोडी निर्माण करुन वाढत्या हल्ल्यांना रोखता येणे शक्य आहे. - यु. टी. पवार, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह
खेळ आणि समुपदेशनातून कैद्यांचे ‘अँगर मॅनेजमेंट’ : येरवडा कारागृह प्रशासनाचा अभिनव उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 14:11 IST
जुलैच्या पहिल्या आठवड्यात हल्ल्याच्या तीन घटना येरवडा कारागृहात घडल्या होत्या.
खेळ आणि समुपदेशनातून कैद्यांचे ‘अँगर मॅनेजमेंट’ : येरवडा कारागृह प्रशासनाचा अभिनव उपक्रम
ठळक मुद्देयेरवडा कारागृह प्रशासनाचा अभिनव उपक्रम : विविध उपक्रमांतून कैद्यांना ठेवणार कार्यरत