ट्रान्सफॉर्मर स्फोटातील ‘त्या दोघांची’मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 14:52 IST2018-06-16T14:47:38+5:302018-06-16T14:52:01+5:30
खराडी एमआयडीसी झेन्सार आयटी पार्कच्या ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात युवक व युवती गंभीर भाजल्याची घटना गेल्या महिन्यात ११ मे रोेजी घडली होती.

ट्रान्सफॉर्मर स्फोटातील ‘त्या दोघांची’मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी
चंदननगर: खराडी बाहयवळण मार्गावरील पदपथावर असलेल्या महाावितरणच्या रोहित्राचा स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या आयटी कंपनीतील नोकरीला असलेल्या युवक व युवकाचा खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. खराडीतील झेन्सार आयटी पार्कलगत असलेल्या पदपथावर ११ मे रोजी सायंकाळी ही दुर्घटना घडली होती. प्रियांका झगडे (वय २४,रा.सातारा) आणि पंकज खुणे (वय २६,रा. वर्धा) ही दोघे गंभीर जखमी झाले होते. महिन्याभरापासून त्या दोघांची मृत्यूशी झुंज सुरु होती. ती अखेर अयशस्वी ठरली. उपचारादरम्यान पंकज याचा काल (दि. १५ जून ) व प्रियंका हिचा शनिवारी (दि.१६जून ) रोजी मृत्यू झाला.
खराडी बाहयवळण मार्गावर झेन्सार आयटी कंपनीनजीक असलेल्या पदपथावर महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे. ११ मे रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास रोहित्राचा अचानक स्फोट झाला. त्यावेळी तेथून निघालेली प्रियंका आणि पंकज यांच्या अंगावर रोहित्रातील गरम आॅईल उडाल्याने ते गंभीर जखमी झाले. पदपथालगत असलेल्या सँडविच विक्रीच्या स्टॉलला झळ पोहोचली. गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान, प्रियांका आणि पंकज यांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याचे चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी सांगितले. पदपथावर असलेल्या खाद्यापदार्थ विक्रीच्या स्टॉलला आग लागून दुर्घटना घडल्याचा अहवाल महावितरणकडून देण्यात आला आहे. याबाबत विद्युत निरीक्षकांनी दिलेल्या अहवालाची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल,असे पोलीस निरीक्षक मुळीक यांनी स्पष्ट केले.
या घटनेत आयटी कंपनीतील कर्मचारी प्रियंका झगडे आणि पंकज खुणे यांचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात गेले महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराचा खर्च परवडत नसल्याने अखेर पंकजच्या कुटुंबीय त्याला घरी घेऊन गेले. जवळपास आठ लाख रुपये रूग्णालयाचे बिल पंकजच्या कुटुंबीयांना आले होते. महावितरणने जबाबदारी झटकली, अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी ते ईआॅन आयटी पार्क रस्त्यावरील खराडी एमआयडी रस्त्यावर कंपनीचा मोठा ट्रान्सफॉर्मर आहे. ११ मे रोजी संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान या ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट झाला होता. सदर घटनेतील जखमी युवक आणि युवती हे झेन्सार आयटीपार्कमधील कंपनीत नोकरीला होते.
......................