मैत्रीचा गैरफायदा घेत महिलेचा अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल
By भाग्यश्री गिलडा | Updated: April 22, 2024 18:27 IST2024-04-22T18:27:24+5:302024-04-22T18:27:39+5:30
आरोपीने मैत्रीचा गैरफायदा घेऊन फिर्य़ादी यांच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते

मैत्रीचा गैरफायदा घेत महिलेचा अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल
पुणे : मैत्रीचा गैरफायदा घेऊन मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवाताना मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून तो ऑनलाईन वेबसाईटवर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी महेश हनुमंतराव टोटरे (वय- २७, रा. लोहगाव) याच्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव परिसरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेने रविवारी (दि. २१) पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा प्रकार मे २०१८ ते एप्रिल २०२४ या कालावधीत घडला आहे. आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहत असून त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आरोपीने मैत्रीचा गैरफायदा घेऊन फिर्य़ादी यांच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच आरोपीने महिलेच्या नकळत त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ तयार केला. तो अश्लील व्हिडीओ महिलेच्या संमतीशिवाय ऑनलाईन वेबसाईटवर अपलोड करुन व्हायरल करत महिलेची बदनामी केली. तसेच आरोपीच्या मोबाईलमध्ये असलेले दोघांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंभार करत आहेत.