पुण्यात आणखी एका तरूणानं उचललं टोकाचं पाऊल; येरवड्यात १८ वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 22:49 IST2025-03-21T22:48:41+5:302025-03-21T22:49:13+5:30
शवविच्छेदन अहवालामध्ये गळफास घेऊन मयत झाला असल्याचा अहवाल देण्यात आला असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे

पुण्यात आणखी एका तरूणानं उचललं टोकाचं पाऊल; येरवड्यात १८ वर्षीय मुलाचा मृत्यू
लोहगाव - येरवडा येथील पंचशील नगर समोरील येरवडा जेल जवळ प्रेसच्या जागेत असणाऱ्या जुन्या पडीक इमारतीमध्ये एका १८ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही बाब दि. १७ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास उघड झाली.
त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता, सदर मुलाचे नाव साहिल विलास कांबळे (18 वर्षे) रा.धानोरी, विश्रांतवाडी, पुणे असे असल्याचे समजले. सदर मुलाचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालय येथे पाठवण्यात आला होता. साहिलच्या अंगावर इतर कोणत्याही संशयास्पद जखमा वगैरे आढळून आले नव्हत्या. त्यामुळे शवविच्छेदन अहवालामध्ये गळफास घेऊन मयत झाला असल्याचा अहवाल देण्यात आला असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत मुलाचे वडील विलास शिवराम कांबळे, (45 वर्षे) यांचा जबाब नोंदवून अधिक चौकशी करण्यात येत आहे. अपमृत्यू 68/2025 प्रमाणे नोंद घेण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जोरे तपास करीत आहेत.
किल्ले लोहगडावरून उडी मारून आत्महत्या
नुकतीच मावळ तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले लोहगड गडावरून उडी मारून उच्चशिक्षित तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडली होती. २१ वर्षीय मानसी गोपाळ गोविंदपुरकर सकाळी ०७:३० कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघून गेली व कॉलेजला न जाता ती एकटी मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड येथे (दि.१८)रोजी सकाळी ९ च्या सुमारास पोहचली. गडाच्या रिवर्स वाटरफाँलच्या कड्यावरून शिक्षणाच्या नैराश्यातून उडू मारुन आत्महत्या केली.