अमाेल काेल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील शेवटच्याच दिवशी भरणार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 15:46 IST2019-04-08T11:54:03+5:302019-04-19T15:46:15+5:30
यंदाच्या निवडणुकीत माेठी लढत असणाऱ्या शिरुर मतदार संघातील दाेन प्रतिस्पर्धी एकाच दिवशी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

अमाेल काेल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील शेवटच्याच दिवशी भरणार अर्ज
पुणे : यंदाच्या निवडणुकीत माेठी लढत असणाऱ्या शिरुर मतदार संघातील दाेन प्रतिस्पर्धी एकाच दिवशी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार अभिनेते अमाेल काेल्हे आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दाेघेही उद्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर काेल्हे यांच्यासाेबत अजित पवार, दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीने अभिनेते अमाेल काेल्हे यांना शिरुरमधून उमेदवारी जाहीर केल्याने शिरुरच्या जागेला महत्त्व प्राप्त झाले आहे. काेल्हे यांच्या विराेधात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे रिंगणात आहेत. आढळराव पाटील यांनी काेल्हे हे मराठा नाहीत हे सांगून वाद ओढवून घेतला हाेता. याला उत्तर देताना मी शिवाजी महाराजांचा मावळा असल्याचे काेल्हे यांनी म्हंटले हाेते. सध्या प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने सभा, बैठका दाेन्ही पक्षांकडून सध्या सुरु आहेत.
उद्या अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी अमाेल काेल्हे आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासाेबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच दिलीप वळसे पाटील तसेच राष्ट्रवादीचे इतर आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तर उद्या आढळराव पाटील हे सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.