मनसेने बांगलादेशी घुसखोर घरात घुसून बाहेर काढणे चुकीचे, त्यांना अमित शहांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 21:53 IST2020-02-22T21:35:22+5:302020-02-22T21:53:24+5:30
मुख्यमंत्र्यांनी सीएए, एनआरसी, एनपीआर बददल आपली बदललेली भूमिका सांगितली आहे. पण त्या अगोदरची त्यांची भूमिका ही विरोधातली होती...

मनसेने बांगलादेशी घुसखोर घरात घुसून बाहेर काढणे चुकीचे, त्यांना अमित शहांची मदत
पुणे : राज्यात महाविकास आघाडी ही समान कार्यक्रमावर झाली आहे. या कार्यक्रमांवर एकजूट असेल तर सरकार पडायचे काही कारण नाही. पण काही लोकांनी नाणारसारखा प्रश्न महत्वाचा आहे वगैरेचा आग्रह धरला तर सरकार पडू शकते असे स्पष्ट मत राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी आणि एनपीआरला पाठिंबा दर्शविला आहे त्याविषयी विचारले असता केतकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सीएए, एनआरसी, एनपीआर बददल आपली बदललेली भूमिका सांगितली आहे. पण त्या अगोदरची त्यांची भूमिका ही विरोधातली होती. याबाबत बाकी विरोधी पक्षांबरोबर राहू असे त्यांनी सांगितल होते. मध्यंतरीच्या काळातही त्यांची बैठक झाल्यानंतर त्यांना काय पटले किंवा काय नाही. या संदर्भात त्यांच्याकडून कोणताही खुलासा आलेला नाही. काही कॉंग्रेसमधल्या नेत्यांनीच सीएए, एनआरसी आणि 370 कलमला आधीच पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे विरोधकांबरोबरच सरकारच्या भूमिकेला समर्थन देणारी लोक सर्व पक्षात आहेत.
फक्त शिवसेनेत नाहीत. ते ओळखूनच मुख्यमंत्र्यांनी किती विरोध होईल याचा अंदाज घेतला आहे. एनपीआर अजून सुरू व्हायचयं. प्रत्यक्षात लोकांच्या व्यवहारावर काय परिणाम होतात हे बाहेर येईल तेव्हा अंदाज येईल. कॉंग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा विषय गुंतागुंतीचा आहे तो समजून घ्या असा सल्ला दिला आहे, त्याविषयी छेडले असता हा विषय गुंतागुंतीचा आहे हे कॉंग्रेस नेत्यांनाही समजून घ्यावे लागेल. केवळ शिवसेनेला सांगून चालणार नाही.
मनसे स्वत: बांगलादेशी घुसखोर घरात घुसून बाहेर काढत आहे आणि पोलिसांच्या ताब्यात देत आहे, या मनसेच्या भूमिकेबददल बोलताना ते पुढे म्हणाले, हे मनसेचे वागणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्यावरच कारवाई व्हायला पाहिजे. पण मनसे जे करते तेच मुळी पोलिस आणि अमित शहा यांच्या मदतीने करते. त्यामुळे त्यांना कोण सांगणार? घरात घुसणा-यांना कुटुंबियांनीच विचारले पाहिजे तुमचा अधिकार काय? इतरांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.