वालचंदनगर : वालचंदनगर येथील भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमी स्कूलमधील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील विद्यार्थिनी मंगळावरील मोहीम व वातावरणाची माहिती विविध प्रयोगांतून देणार आहेत.येथील शाळेमध्ये अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठीतील अॅगा, सिमरन बटर, अॅलिसा ब्लंट, आरथी नदाल, रहैदा या विद्यार्थिनी आल्या आहेत. ७ ते ११ मे या कालावधीमध्ये त्या शाळेतील विद्यार्थ्यांना मंगळ ग्रहावरील वातावरणाचे धडे देणार असून, मंगळवरती कसे जीवनमान असेल, जाण्यासाठी कशा प्रकारच्या रॉकेटची गरज आहे, संगणक प्रणालीचा कसा उपयोग करता येईल, मंगळावरती बलून कार कशी असेल, सोलर ओव्हनचा कसा वापर करावा लागेल याचे धडे देण्यात येणार आहेत.शाळेच्या वतीने सर्व परदेशी विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी शाळा समितीचे उपाध्यक्ष पांडुरंग कवडे, वालचंदनगर कंपनीच्या भारती पटेल, शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर, पर्यवेक्षक गौरीशंकर हत्तीकाळ, प्रेमा सिंग, अमोल गोडसे, प्रचना माळशिकारे, रवींद्र वेदपाठक उपस्थित होते.वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. पिल्लई व शाळा समितीचे अध्यक्ष धीरज केसकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबिराचे आयोजन केले असल्याचे माहिती क्षीरसागर यांनी दिली.
अमेरिकन विद्यार्थी देणार मंगळ मोहिमेची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 02:49 IST