रूग्णवाहिका धूळखात
By Admin | Updated: January 6, 2015 00:31 IST2015-01-06T00:31:16+5:302015-01-06T00:31:16+5:30
अगोदरच रुग्णवाहिकांची कमतरता त्यातच उपलब्ध रुग्णवाहिकांवर पुरेसे चालक नाहीत, अशी अवस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची झाली आहे.

रूग्णवाहिका धूळखात
मंगेश पांडे ल्ल पिंपरी
अगोदरच रुग्णवाहिकांची कमतरता त्यातच उपलब्ध रुग्णवाहिकांवर पुरेसे चालक नाहीत, अशी अवस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची झाली आहे. यामुळे रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसोय होत आहे.
वैद्यकीय विभागाला महापालिकेकडून १२ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, यातील ४ बंद आहेत. केवळ ८ रुग्णवाहिकांवर सध्या वैद्यकीय विभागाची ‘मदार’ आहे. मात्र, या ८ रुग्णवाहिकांपैकीदेखील ४ रुग्णवाहिका चालकाअभावी रुग्णालयासमोरच उभ्या असतात. त्या केवळ शोभेसाठीच आहेत का, असा सवाल नागरिक उपस्थित करतात.
शहराची लोकसंख्या वीस लाखांच्या वर आहे. रुग्णांच्या सेवेसाठी पिंपरीत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, भोसरी, जिजामाता, तालेरा रुग्णालय उभारण्यात आले आहेत. त्याचा दररोज शेकडो रुग्णांना फायदाही होत आहे. वायसीएम रुग्णालयात सातशे खाटांची सोय असून, विविध वैद्यकीय सुविधाही उपलब्ध आहेत. रोजच शहरासह शहराबाहेरीलही रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होत असतात. यामध्ये हद्दीबाहेरील रुग्ण दाखल होण्याची संख्याही अधिक आहे.
रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे, उपचारानंतर घरी सोडविणे, मृतदेह नेणे यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अनेकदा रुग्णालयीन कर्मचारी व नातेवाइकांमध्ये वादाच्या घटना घडतात. रुग्णालयासमोर रुग्णवाहिका उभ्या असतानाही केवळ चालक नसल्याने त्या उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक संताप व्यक्त करतात. उपचारादरम्यान एखादा रुग्ण दगावल्यास नातेवाइकांची मन:स्थिती ढासळलेली असते. अशातच रुग्णालयाकडून वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास नातेवाईक आक्रमक होतात.
शहर व परिसरात शासनाच्या काही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, त्या केवळ आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध होतात. उपचारानंतर घरी सोडविणे, तसेच मृतदेह नेण्यासाठी या रुग्णवाहिकांचा उपयोग होत नाही.
महापालिकेच्या रुग्णवाहिका सवलतीच्या दरात दिल्या जातात. मात्र, त्या उपलब्धच होत नसल्याने रुग्णाच्या नातेवाइकांना खासगी रुग्णवाहिकांकडे धाव घ्यावी लागते. मागतील तितके भाडे देणे भाग पडते. या रुग्णवाहिकांचा भाडेदर अधिक असल्याने नातेवाइकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. औषधोपचाराच्या खर्चाने अगोदरच मेटाकुटीस आलेल्या नातेवाइकांची रुग्णवाहिकेचे भाडे देतानाही दमछाक होते. यासाठी अधिकाधिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याबाबत महापालिका प्रशासन मात्र गंभीर दखल घेत नाही.
१ सध्या ८ रुग्णवाहिकांसाठी केवळ १८ चालक उपलब्ध आहेत. प्रत्येक पाळीत चार ते पाचच चालक असतात. त्यामुळे उर्वरित रुग्णवाहिका तशाच उभ्या राहतात. त्यामुळे ८ रुग्णवाहिकांसाठी प्रत्येक पाळीला ८ या प्रमाणात तीन पाळीला २४ व बदलीसाठीचे ४ अशाप्रकारे एकूण २८ चालक आवश्यक आहेत.
२महापालिकेची रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णवाहिका चालकांची ‘चलती’ सुरू आहे. रुग्णालय परिसरात खासगी रुग्णवाहिकांचाच गराडा असतो. पालिकेची रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यास खासगी रुग्णवाहिकेशिवाय पर्याय नसतो. त्यांमध्ये लोकप्रतिनिधींसह उद्योजक, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या रुग्णवाहिकांची संख्या अधिक आहे.
३रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवा आहे. यासाठी पुरेसे चालक असणे गरजेचे आहे. मात्र, चालकांअभावी रुग्णवाहिका पडून आहेत. याउलट महापालिकेच्याच इतर विभागांत चालक आहेत; मात्र वाहने उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. ज्या विभागात अतिरिक्त चालक आहेत ते रुग्णवाहिकांवर नेमावेत, अशी मागणी होत आहे.
४महापालिकेच्या रुग्णवाहिकांकडून शहरांतर्गत ११० रुपये भाडे आकारले जाते, तर हद्दीबाहेर जाण्यासाठी प्रतिकिलोमीटर १० रुपये भाडे घेतले जाते. मोठ्या खासगी रुग्णवाहिका शहरांतर्गत किमान ५०० रुपये भाडे घेतात, तर तीनशे किलोमीटरच्या पुढे प्रतिकिलोमीटर १२ रुपये दराने भाडे आकारले जाते.
सध्या वैद्यकीय विभागाकडे १२ रुग्णवाहिका असून, त्यापैकी चार बंद अवस्थेत आहेत. चालकांची कमतरता असल्याने पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका पुरविणे कठीण जाते. उपलब्ध आठ रुग्णवाहिकांवर पुरेशा प्रमाणात चालकांची आवश्यकता आहे.- डॉ. मनोज देशमुख, वैद्यकीय अधीक्षक