Allowance for PMP carrier-drivers for income generation | उत्पन्नवाढीसाठी ‘पीएमपी’च्या वाहक-चालकांना भत्ता
उत्पन्नवाढीसाठी ‘पीएमपी’च्या वाहक-चालकांना भत्ता

ठळक मुद्देउत्पन्नवाढीसाठी पीएमपीकडून विविध उपाययोजनाप्रोत्साहन भत्त्यासाठी उत्पन्नाचे उद्दिष्ट निश्चित

पुणे : कमी झालेले उत्पन्न वाढविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)कडून चालक व वाहकांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. याची सुरूवात प्रायोगिक तत्वावर ९४  मार्गांवर केली जाणार आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न आणणाऱ्या चालक व वाहकांना प्रत्येकी १० टक्के भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील काही महिन्यांत ‘पीएमपी’च्या उत्पन्नांमध्ये घट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित वेळेत करणेही शक्य होत नाही. या अनुषंगाने उत्पन्नवाढीसाठी पीएमपीकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाहक व चालकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सुरूवात शुक्रवार (दि. १५) पासून केली जाणार आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर तीन कॉरिडॉरमधील ९४ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. कात्रज ते पुणे स्टेशन, कात्रज ते शिवाजीनगर व स्वारगेट ते धायरी या तीन कॉरिडॉरची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक कॉरिडॉरमध्ये अनुक्रमे १९, ६४ व ११ असे मार्ग आहेत. तीनही कॉरिडॉरमध्ये प्रवाशांचा प्रतिसाद खुप चांगला मिळतो. हे मार्ग चांगले उत्पन्न मिळवून देणारे आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पीएमपीने या तीन कॉरिडॉरची निवड केली आहे. 
प्रोत्साहन भत्त्यासाठी उत्पन्नाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सध्या उत्पन्न व प्रवासी संख्या या तुलनेत हे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न मिळविणारे चालक व वाहक यांना प्रत्येकी १० टक्के प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. तसेच अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी बस संचनलाचे नियोजन केले जाणार आहे. या योजनेला मिळालेल्या प्रतिसादानंतर अन्य मार्गांसाठीही ही योजना सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रवाशांना वेळेत सुलभ बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी आणखी उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. 
------------------------
कॉरिडॉर                                         मार्ग संख्या
कात्रज ते पुणे स्टेशन                       १९
कात्रज ते शिवाजीनगर                    ६४
स्वारगेट ते धायरी                           ११
एकुण                                             ९४
----------------------------

Web Title: Allowance for PMP carrier-drivers for income generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.